नाम. उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे १० ऑक्टोबरपासून शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यात येतील. याची सुरुवातही काल रविवार १० ऑक्टोबरपासून करण्यात आली. मागील २-३ वर्ष शहरातील नळपाणी योजना, सीएनजी पाईपलाईनचे केबल टाकण्याचे काम शहरी भागात सुरू असल्याने या कामासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले होते. तसेच आतली सर्व माती सुद्धा रस्त्यावर आली होती.
नगर परिषदेकडून तात्पुरत्या स्वरूपातील रस्त्यांची डागडूजी माती, चिरा, डबर, खडी टाकून करण्यात येत होती. परंतु, काही काळाने स्थिती जैसे थेच होत होती. त्यामुळे विनाकारण या साऱ्याचा त्रास वाहन चालकाना होत असून, रोजच्या निव्वळ आश्वासनांना रत्नागिरीतील जनता कंटाळली होती.
या खड्डेमय रस्त्यामुळे अनेकांची वाहने पंक्चर झाली, चारचाकी गाड्यांची मोठी कामे निघाली. त्यामुळे सोशल मीडियावर वैतागलेली जनता रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल स्वच्छ सुंदर रत्नागिरी ऐवजी, खड्डयात गेलेली रत्नागिरी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत होती. जिथे तिथे असलेल्या खोदकामामुळे अपघात होवून अनेकजण जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या. शिवाय विरोधक मंत्री उदय सामंत यांच्या जुन्या आस्वसनात्मक भाषणाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकून चेष्टा उडवत होते. याला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन लवकरच शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यात येतील असे सांगितले होते.
काल रस्ता डांबरीकरणाला सुरुवात झाली खरी पण रात्रीच मुसळधार कोसळलेल्या पावसाने डांबरीकरण टिकेल का? जनतेचे पैसे असेच पाण्यात वाहून तर जाणार नाहीत ना! असे प्रश्न नागरिकांना पडायला लागले आहेत. नाम. सामंत पुढे म्हणाले होते की, रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज, थिबापॅलेस रोड, नाचणे रोड व कोकणनगर हे प्रमुख रस्ते काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ९४ कोटींचा डीपीआर बनवण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरात नळपाणी योजनेचे काम पूर्णत्वाकडे जात असताना सर्व नळधारकांना मोफत पाणीमीटर देण्यात येणार आहे. त्यासाठी न.प.मार्फत साडेतीन कोटीचा निधी खर्च होणार आहे.
तसेच आता रस्त्याच्या खोदकाम जवळपास पूर्ण होत आल्याने रस्ता डांबरीकरणाची कामे ४ टप्प्यात नवीन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने केली जाणार आहेत. शहरात ३५ कोटींची रस्ताची कामे सुरू होणार आहेत, असे नाम. सामंत यांनी सांगितले आहे.