मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रो-रो सेवेच्या प्राथमिक चाचणीसाठी विजयदुर्ग बंदरात दाखल झालेल्या ‘एमटूएम फेरीज’ कंपनीच्या ‘एमटूएम प्रिन्सेस’ या प्रवासी बोटीची बुधवारी सकाळी यशस्वी चाचणी करण्यात आली. या सांगरी रो-रो सेवेसाठी विजयदुर्ग बंदरात नव्याने बांधण्यात आलेल्या जेटीवरून या प्रवासी बोटीमध्ये चारचाकी वाहने चढवून प्रात्यक्षिकही घेण्यात आले. राज्याचे मत्स्य व्यवसाय व. बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष पुढाकार व संकल्पनेतून साकार होणारा हा जलवाहतूक प्रकल्प येत्या एक दोन दिवसांत पूर्णतः ‘एक्टीव्ह मोड’वर येणार असून हा प्रकल्प सिंधुदुर्ग पर्यटनाच्यादृष्टीने ‘मस्टर स्ट्रोक’ ठरणार आहे. तब्बल ३८ वर्षांनी रो रो बोटसेवा सुरू होणार आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास विजयदुर्ग बंदरात दाखल झालेली एमटूएम प्रिन्सेस ही प्रवासी बोट जेटीवर आणण्यात आली. यावेळी या बोटीचे कॅप्टन मृत्यूंजय सिंग यांचे स्वागत व सत्कार जि. प. माजी उपाध्यक्ष आरिफ बगदादी जि. प. माजी सभापती संजय बोंबडी यांनी केला.
यावेळी भाजपाचे पदाधिकारी बाळ खडपे, पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, पं. स. माजी सदस्या शुभा कदम, भाजपच्या पडेल महिला मोर्चा अध्यक्षा संजना आळवे, पडेल भाजपा सचिव प्रदीप साखरकर, अंकुश ठुकरूल, ग्रेसीस फर्नांडिस, विजयदुर्ग सरपंच रियाझ काझी, ग्रा. पं. सदस्य दिनेश जावकर, भाजप युवा कार्यकर्ता वैभव करंगुटकर, प्रणय तारकर, वैशाली सरवणकर (मुंबई) यांच्यासह मेरिटाईम बोर्डाचे कॅप्टन संदीप भुजबळ, बंदर अधिकारी उमेश महाडिक आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या कार्यकर्तुत्वाचा जयघोष भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. कॅप्टन सिंग यांनी उपस्थितांना या बोटीच्या अंतर्गत व्यवस्थेची, बोटीमधील उपलब्ध सोयीसुविधांची माहिती उपस्थितांना दिली. पाऊण तासाच्या कालावधीत प्रात्यक्षिकासह या बोटीची प्राथमिक चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही बोट सकाळी ९.१५ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली.