कोरोना काळामध्ये अनेक निवासी डॉक्टर साधारण गेले दीड वर्ष कोरोना सेवेमध्ये असल्याने त्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविता आलेला नाही. त्यामुळे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी मार्डतर्फे अनेक महिन्यांपासून केली जात आहे. शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळून देखील अनेक महिन्यांचा कालावधी उलटला तरी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने अद्याप देखील कोणती कार्यवाही न केल्यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने शेवटी आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे.
या संपामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्याने रुग्णव्यवस्था कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत २ महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत मंत्री अमित देशमुख यांनीही या मागणीकडे सकारात्मकपणे विचार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, नंतर देखील यावर ठोस कार्यवाही विभागाकडून करण्यात आलेली नाही. यामुळे अखेर सहनशक्तीचा अंत झाल्याने मार्डने शुक्रवारपासून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपावर जाण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला आहे.
शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून डॉक्टर संपावर जाणार असले तरी, रुग्णांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होऊ नये याची सुद्धा तितक्याच जबाबदारीने काळजी घेऊन, आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सर्व सेवा सुरू राहणार असल्याचे मार्डने आधीच स्पष्ट केले आहे. काल रात्री सेंट जॉर्ज रुग्णालयात संपाच्या आखणी बाबतीत मार्डची, वैद्यकीय संशोधन आणि संचालनालयाच्या संचालकांसोबत, रात्री उशीरापर्यत बैठक सुरू होती आणि या बैठकीनंतरच पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे मार्डने यांनी सांगितले आहे.