भाजप आमदार नीतेश राणे अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करून बोलत असताना त्यांना आवर घालण्याचे काम सत्ताधारी करीत नाहीत, याचा अर्थ सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली आहे. अशावेळी सामान्य जनता एकत्र येऊन त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी येथे दिला. दरम्यान, सत्ता नसेल तर संयम राखायचा असतो, असे सांगत आमदार शेखर निकम यांचे नाव न घेता त्यांनाही सुनावले. येथील सावरकर मैदानात झालेल्या सभेत ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्याने मुख्यमंत्री दिला.
त्यांची पुढची पिढी ज्या पद्धतीने अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करीत आहे, ते पाहून एका मुख्यमंत्र्याची पुढची पिढी अशा पद्धतीने तयार झाल्याचे महाराष्ट्रामध्ये उदाहरण नाही. त्यांना कोणीही आवर घालत नाही, याचा अर्थ त्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे. त्यांना सत्तेची मस्ती आहे आणि सत्तेची मस्ती जेव्हा डोक्यात जाते तेव्हा महाराष्ट्राची जनता एकत्र होऊन त्यांना सत्तेतून बाहेर घातल्याशिवाय राहणार नाही. सत्तेचा वापर योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. मात्र, सध्या तो होताना दिसत नाही. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर ८० वर्षांपूर्वी बांधलेले वेगवेगळे पुतळे बऱ्याच सामना करून आजही उभे आहेत.
ते वाऱ्याने घडले नाहीत, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरुन्य वाऱ्यामुळे पडत असेल, तर भ्रष्टाचार किती पातळीवर गेला आहे, याचा अंदाज बांधता येईल, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यांना आदेश द्यायचे, तुम्ही सीडधात गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठाचेही रक्षण करा, त्याचे नुक्सान होणार नाही याची काळजी घ्या. बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीच्या लोकांचे हित जपले पाहिजे हेच रयतेचे राज्य आहे, ही शिकवण शिवाजी महाराजांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व भाषा आणि जाती, धर्माचे लोक राहतात. त्यांचे हित जपण्याचे काम म्हणजेच शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले काम व्हायला हवे.”
नव्या नेतृत्वामुळे आनंद – बाळासाहेब उर्फ पी. के. सावंत, माजी आमदार नाना जोशी, बाळ माळे, गोविंदराव निकम यांची साथ मला मिळाली. लोकहिताचे आदर्श जपणारी ही माणसे आज हयात नाहीत; पण त्यांचा आदर्श आपल्यासमोर आहे. त्याच पद्धतीचे काम करण्यासाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून प्रशांत यादव तयार होत आहेत, याचा मला आनंद आहे, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले.