महायुती सरकारने ५ वर्षांचा कार्यक्रम सेट केला आहे. या पाच वर्षांत ४० लाख कोटींचे उद्योग राज्यात आणणार असून रत्नागिरीत होऊ घातलेल्या उद्योगांना जराही निधी कमी पडू देणार नाही, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी सोमवारी येथे केली. ते रत्नागिरीत टाटा स्कील डेव्हलपमेंट सेंटरच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. रत्नागिरीत विविध विकासकाम ांच्या भूमिपूजन तसेच काही कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार हे सोमवारी रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी उद्यमनगर येथील टाटा स्कील सेंटरचे भूमिपूजन ना. अजित पवार यांच्याहस्ते पार पडले. यावेळीं पालकमंत्री ना. उदय सामंत, खा. सुनिल तटकरे, आ. शेखर निकम यांच्यासह जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रोजगार निर्मिती – यावेळी ना. ‘उदय सामंत यांनी रत्नागिरीत सुरू होत असलेल्या उद्योगांबद्दल माहिती दिली. भविष्यात कोकणातील तरुणांना रोजगार कोकणातच मिळेल आणि महाराष्ट्रातील एक सुंदर शहर म्हणून रत्नागिरीची ओळख होईल, असे सांगून अवघ्या काही मिनिटांत त्यांनी आपले मनोगत संपवले.
तटकरेंनी केले सामंतांचे कौतुक – त्यानंतर खा. सुनिल तटकरे यांनी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचे तोंडभरून कौतुक केले. रत्नागिरीचे चित्र बदलण्यात उदय सामंत यांचा मोठा हात आहे. प्रदूषणविरहीत कारखानदारी कोकणात येतेय, त्यामुळे रोजगार उपलब्ध होईल. स्थलांतर थांबेल, उद्योगांना प्रोत्साहन देणारे शहर म्हणून रत्नागिरीची ओळख होईल, असा विश्वास खा. तटकरे यांनी व्यक्त केला.
चेहरामोहरा बदलतोय – यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री ‘ना. अजित पवार यांनी होऊ घातलेल्या उद्योगांचे स्वागत केले. काळानुरुप काही निर्णय घ्यावे लागतात, त्यानुसार निर्णय घेण्यात आले. आज रत्नागिरी शहर बदलत आहे. रत्नागिरीचा चेहरामोहरा बदलतोय. लवकरच येथील विमानतळ सुरू होईल. या विम ानतळावरील धावपट्टीच्या साईजप्रमाणे विमाने उतरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीत स्किल सेंटर – ते पुढे म्हणाले की, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी घडले पाहिजेत. किंबहुना विद्यार्थ्यांनी स्वतःला घडविले पाहिजे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे, पहिले स्किल सेंटर हे चंद्रपूर येथे तर दुसरे गडचिरोली येथे झाले. आता तिसरे स्किल सेंटर रत्नागिरी येथे होत आहे. येत्या काळात पुणे, नाशिक, खानदेश आदी भागांत अशी स्किल सेंटर उभी राहतील, असे ना. अजित पवार यांनी सांगितले.
रोजगाराच्या संधी – टाटा उद्योगसमूहाने अनेकांना घडविले आहे. उत्पादन क्षेत्रात आता आवश्यक कुशल कामगार, ऑपरेटर, कारागीर या स्किल सेंटरमधून उपलब्ध होतील. ज्यांनी महायुती सरकारला बहुमत दिले, विश्वास दाखविला त्यांचे ऋण अशा विकासात्मक कामांतून व रोजगाराच्या संधी निर्माण करून फेडले जाईल.
निधी कमी पडू देणार नाही – जे प्रकल्प रत्नागिरीत होऊ घातलेत त्या प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही, असे सांगताना पर्यावरणाचा प्रकल्प उभे राहतील. कोस्टल रोडलादेखील प्राधान्य दिले आहे. रेल्वे, विमानतळ, जलवाहतूक यांचा सकारात्मक परिणाम कोकणवर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्तं केला.