मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील धोकादायक दरडी व कोसळलेल्या सरंक्षक भिंतीवर उपाययोजना म्हणून गॅबियन वॉल व दरडीसाठी लोखंडी जाळ्या टाकण्याचे काम सुरू आहे. या घाटात अनेक ठिकाणी चौपदरीकरणांतर्गत केलेले काँक्रिटीकरण खचले आहे. काही ठिकाणी तडेही गेले आहेत. त्यामुळे धोकादायक बनलेल्या या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. परशुराम घाटातील चौपदरीकरण या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिले आहे. सुरुवातीला कूळ, खोत व देवस्थानच्या मोबदल्यावरून परशुराम नेहमी चर्चेत आहे. परशुराम घाटाच्या डोंगरमाथ्यावर व पायथ्याशी असलेल्या वस्तीचा सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला. परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतले आहे.
पावसाळ्यापूर्वी घाटातील अतिशय धोकादायक असलेल्या ठिकाणी काँक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले होते तसेच काही ठिकाणी रस्ताही खचला होता. त्यावर उपाययोजना करण्याच्यादृष्टीने ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू असतानाच दोन महिन्यांपूर्वी अचानक रस्त्याचा मोठा भाग खचला आणि त्या ठिकाणची सरंक्षक भिंतही कोसळली. तेव्हापासून आजतागायत परशुराम घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी गॅबियन वॉल उभारली जात आहे. त्यासाठी पायथ्यालगत डबर व सिमेंटच्या आधारे मजबुतीकरण केले जात आहे. या कामासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. याच पद्धतीने दरडीच्या बाजूने आठ ड्रीलच्या साहाय्याने लोखंडी रॉड खडकामध्ये बसवून त्यावर जाळी टाकण्याचे काम सुरू केले आहे.
एकीकडे ही दोन्ही कामे सुरू असताना खचलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरील परशुराम घाटात आतापर्यंत अनेकदा दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत त्याशिवाय अजूनही हा धोका टळलेला नाही. अनेक ठिकाणी दरडीच्या भागाला तडे गेले असून, पावसाळ्यात हा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी उंच दरडीच्या भागात पायरीप्रमाणे टप्पे तयार करण्याची मागणी होत आहे. तसेच खचलेल्या काँक्रिटीकरणाच्या ठिकाणी वेळीच उपाययोजना न झाल्यास त्या खालील गॅबियन वॉलवर पुन्हा ताण येऊन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी खचलेल्या काँक्रिटीकरणावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.