24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriगणेशोत्सव आला, खड्डे बुजवा…. हे आता थांबवा !

गणेशोत्सव आला, खड्डे बुजवा…. हे आता थांबवा !

तात्पुरती मलमपट्टी किंवा राजकीय फायदा मिळवण्यासाठी दिखावा केला जातो.

महामार्गावरील आणि त्यातही मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची रडकथा अर्थात् रखडकथा गेल्या वीस वर्षांपासूनची वा त्या आधीपासूनची आहे. त्यावर या समस्या महत्त्वाच्या नाहीत, अशा तऱ्हेने राज्यकर्त्यांची वागणूक आहे. उपाय योजनेपेक्षा प्रतीकात्मक काहीतरी करून वा तात्पुरती मलमपट्टी किंवा राजकीय फायदा मिळवण्यासाठी दिखावा केला जातो. हे वर्षानुवर्षे कोकणी माणसाने सहन केले आहे. मुद्दा कोकणी सहनशील आहे का, हा नाही. कोकणवासीयांच्या विचारसरणीतच काही गफलत आहे. मुंबई-गोवा महामार्ग, गुहागर-विजापूर आणि रत्नागिरी-नागपूर या तीन महामार्गांचे काम गतीने याचा कोकणबाबतचा अर्थ गोगलगायीच्या गतीने असावा, सुरू आहे. गणपती आले वा येणार म्हणून महामार्ग खड्डेमुक्त करा, असे सांगितले जाते. यातच गफलत आहे. महामार्ग हा उत्तम रस्ता म्हणून झालाच पाहिजे, असे बजावण्याऐवजी आम्ही सणवारापुरती मलमपट्टी झाली की, खूश होतो.

चार वर्षांपूर्वी रस्त्यांची हीच अवस्था होती. काम याच गतीने सुरू होते तेव्हा आंदोलनकर्ते वेगळे आणि सत्तेत वेगळे. आता सत्तेतील चेहरे बदलले. आधीचे सत्ताधारी आंदोलनाला उतरले. कोकणवासीय हे निमूटपणे बघतोय. स्वतःच्याच हतबलतेवर करुण हसतो आहे. विनोद करतो आहे, प्रहसने करतो आहे. सध्याचे फॅड म्हणजे रील बनवतो आहे; पण त्याच्या विचारात बदल नाही. नेमका टोकदार विचार करून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत किंवा वृत्ती तो दाखवत नाही. आता गरज आहे, गणपती येणार म्हणून खड्डे बुजवा, सणासाठी लोक येणार म्हणून रस्ते करा, अशा मागण्या सोडून रस्ता हा चांगला झालाच पाहिजे, अशा वृत्तीने आंदोलने करण्याची नाहीतर कोकणी माणूस सहनशील हेच तुणतुणे आणखी चार वर्षे व त्याहून अधिक (महामार्गाबाबत) वाजवावे लागेल. हे थांबणे गणरायाच्या नव्हे, तर कोकणवासीयांच्या हातात आहे. देणार का बुद्धिदाता अशी बुद्धी कोकणवासीयांना ?

पुन्हा येरे माझ्या मागल्या ! – खड्डेमुक्त रस्ते झालेच पाहिजेत. ते टिकाऊ झाले पाहिजेत. टिकाऊ झाले नाहीत, तर संबंधित यंत्रणा त्यासाठी जबाबदार हवी. त्या यंत्रणेला त्याबाबत जाब द्यावा लागेल. वेळप्रसंगी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हा खरेतर योग्य विचार; परंतु आपल्याकडे एखादे आंदोलन, एखादी आरोळी त्यावर थातूरमातूर आश्वासने आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशी अवस्था असते.

RELATED ARTICLES

Most Popular