गणेशोत्सवासाठी आता केवळ एक महिना राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर मूर्तिकार बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. माखजन येथील कांता धामणकर यांनी सध्या गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. माखजनसारख्या ग्रामीण भागात भक्तांना परवडणाऱ्या मूर्ती धामणकर यांच्या कलाकेंद्रात साकारल्या जात असून, या केंद्रामुळे ग्रामीण भागातील कारागिरांना रोजगार उपलब्ध होत आहे. माखजनच्या कुंभारवाडीतील कलाकेंद्रात तयार केल्या जाणाऱ्या मूर्तीना मोठी मागणी असून, रत्नागिरी जिल्ह्यासह गोवा, गुजरात, मध्यप्रदेश त्याचप्रमाणे कोल्हापूर, इचलकरंजी, पुणे, सांगली या भागांतूनही येथील गणेशमूर्तीना मागणी आहे.
शाडूमातीचे दर वाढले असले तरीही या मातीच्या मूर्तीना मोठी मागणी असल्याचे धामणकर यांनी सांगितले. यंदा शाडूच्या मातीचे दर आणि वाहतूक तसेच रंगाचे भाव वधारल्यामुळे गणेशमूर्तीचे दर वाढले आहेत. तरीही बाप्पाच्या मूर्तीची मागणी अधिक आहे तर ग्राहकांच्या मागणीप्रमाणे प्रतिकृती साकारली जात असून, मातीचे दर वाढल्यामुळे मूर्तीच्या किमतीही वाढल्या आहेत. असे असले तरी शाडूमातीच्या मूर्तीना मागणी अधिक आहे. स्थानिक कारागिरांना रोजगार संगमेश्वर तालुक्यातील बाप्पांच्या सुबक आणि आकर्षक मूर्तीवर बारीक रेखीव काम करणारे कारागीर हे स्थानिक भागातील तरुण आहेत.
कलाकेंद्रांमुळे तरुणांनाही स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे या कारागिरांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. बारीक रंगरंगोटी, डायमंड, आकर्षक कपडे परिधान केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तीवर सुबक आणि रेखीव काम करण्याची जबाबदारी कारागिरांवर असते. बाप्पांचं आगमन अवघ्या काही दिवसांवर आले असून, सध्या कलाकेंद्रांमध्ये अनेक आकर्षक गणेशमूर्ती तयार आहेत. महिला कारागीर कारखान्यातून सध्या महिला कारागिरांचे प्रमाण वाढत आहे.
अकुशल कारागीर म्हणून या महिला कार्यरत असल्या तरी येत्या काही वर्षांतच त्या कुशल कारागीर म्हणून पुढे येतील. लहान आकारातील याच मूर्तीना घरगुती पूजेसाठीही मागणी आहे. अगदी लहान मूर्ती खरेदी करण्यापेक्षा फूटभर आकाराच्या मूर्ती खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसतो. लहान मूर्तीच्या किमतीत मोठी मूर्ती मिळत असेल तर मोठ्या मूर्तीचीच स्थापना करण्याकडे भाविकांचा कल आहे. यंदा हंसावरील गणपती, शिवपार्वतीसह गणेश अशा नव्या प्रकारच्या मूर्ती तयार करण्यात आल्या असून, त्यांनाही मोठी मागणी आहे. माखजनमधील या कारखान्यातून ७० ते ११५ प्रकारच्या विविध गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत.