कोरोना काळापासून गावाकडील जमिनीला जास्तच महत्व प्राप्त झाले आहे. आधी केवळ सणासाठी गावाचे घरी परतणारे आता मात्र गावामधील आपल्या जमीन जुमल्याबद्दल माहित करून घेण्यासाठी तलाठी, सरपंच, ग्रामसेवक ग्रामसेवक यांच्या गाठी भेटी घ्यायला लागले आहेत. पण या गाठी भेटींमध्ये काही प्रमाणात गैर प्रकार झाल्याचे सुद्धा निदर्शनात येत आहेत. अनेक गैर प्रकरणे उघडकीस यायला सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळेचे तत्कालीन सरपंच, पोलिस पाटील व अन्य ४ जणांनी मिळून एकाची जमीन परस्पर लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. जमीन मालकाचा बॉण्ड पेपरवर खोटा अंगठा घेऊन फसवणूक करण्यात आली असून, या प्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद नारायण साळुंके वय ८३, रा. गणेशगुळे, नवेंद्रवाडी, ता. जि. रत्नागिरी यांच्या मालकीची जमीन आहे. त्याचा सर्व्हे नं. ३६/अ/१/४ या जमिनीचे वाटप पत्र तयार करून साळुंके तिथे प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही १०० रुपयांच्या ब्रॉण्ड पेपरवर त्यांच्या नावाचा खोटा अंगठा उमटवून जमीन बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे.
आपली जमीन अशी गैरप्रकाराने लाटल्याचे लक्षात आल्यानंतर, साळुंखे यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेशगुळेचे तत्कालीन सरपंच, गणेशगुळेचे पोलिस पाटील, तसेच यशवंत नारायण साळुंके, कृष्णा नारायण साळुंके, प्रकाश विष्णू साळुंके, अशोक विष्णू साळुंके अशा एकूण ६ जणांनी जमीन लाटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी भादविकलम ४२०, ४६५,४६७, ४६८,४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिकचा तपास पोलिसांमार्फत केला जात आहे.