गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने, शासनाकडून चाकरमान्यांच्या प्रवासासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रेल्वेने सुद्धा जादाच्या गाड्या आणि फेऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाने देखील विविध आगारातून बसेसची सोय उपलब्ध करून दिली आहे.
देवरूख आगारातून गणेशोत्सवानिमित्त २६ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे, बोरीवली, भांडुप, पुणे-स्वारगेट, चिंचवड, नालासोपारा, कल्याण, विठ्ठलवाडी आदी शहरांमधील गणेश भक्तांसाठी १८ जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती देवरूख आगारव्यवस्थापक राजेश पाथरे यांनी दिली.
यामध्ये सकाळी ९.३० वा. देवरूख- स्वारगेट, रात्री ८ वा. देवरूख- कल्याण, सकाळी ७.३० वा. करजुवे-बोरीवली, रात्री ७.१५ वा. ओझरे-बोरीवली, रात्री ७ वा. करजुवे-मुंबई, सकाळी ६.३० वा. देवरूख- बोरीवली, सकाळी ८ वा. देवरूख- विठ्ठलवाडी, सकाळी ७.३० वा. देवरूख- ठाणे- बोरीवली, सकाळी ७ वा. देवरूख- बोरीवली, सकाळी ७.४५ वा. संगमेश्वर- मासरंग- बोरीवली, सकाळी ८ वा. देवरूख- बोरीवली, सकाळी ७.३० वा. देवरूख- मुंबई, सकाळी ८.३० वा. देवरूख- कल्याण, सकाळी ७.३० वा. देवरूख- मासरंग- ठाणे-बोरीवली, रात्री ८ वा. संगमेश्वर- चिंचवड, सकाळी ७ वा. देवरूख- भांडुप, सकाळी ६ वा. साखरपा- नालासोपारा, रात्री ७.४५ वा. देवडे-मुंबई आदी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
या व्यतिरिक्त ग्रुप बुकिंग मागणीनुसार वाडी, गाव, वस्तीवरून थेट प्रवासी ग्रुप टोकन बुकींगने जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आगारातून करण्यात आले आहे. प्रवाशांनी व मंडळांनी जादा बसेसची मागणी ७ दिवसांपूर्वी करावी. जेणेकरून बस उपलब्ध करून देण्यासाठी आगाराला पुरेसा अवधी मिळेल, असे आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांनी सांगितले. याबाबत गणेशभक्तांनी देवरूख, साखरपा व संगमेश्वर बसस्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पाथरे यांनी केले आहे.