गणेशोत्सवाचे आगमन व्हायला काहीच कालावधी शिल्लक राहिल्याने लहान मोठ्या सर्वांनाच गणपतीचे वेध लागले असून, गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सध्या गणेश कार्यशाळांमध्ये देखील लगबग वाढली आहे. बाजारपेठेत सतत वाढत जाणाऱ्या महागाईमुळे गणेशमूर्ती तयार करण्याच्या साहित्याच्या दरात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचा फटका मूर्तिकारांना बसत असून, गणेशभक्तांना यावर्षी मूर्तीच्या वाढत्या दराचा सामना करावा लागेल. अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपलेल्या या गणेशोत्सवाचे साऱ्यांना वेध लागले आहेत.
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या शाडूच्या मातीच्या किंमतीमध्येही यावर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. ही माती कोकणामध्ये मिळत नसून, परराज्यांतून आणावी लागते. सर्वसाधारणपणे ही माती किलोवर खरेदी न करता पोत्यावर केली जात असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रत्येक पोत्याच्या किंमतीमध्ये ३० ते ३५ रुपये दराने वाढ झाली आहे.
गणेशमूर्ती लहान एक फुटाची १२०० रुपये, गणेशमूर्ती मोठी ४ ते १२ हजार रुपये, कामगाराची एक दिवसाची मजुरी ५०० रुपये, मातीची किंमत- ५० किलोचे पोते २५० ते ४०० रुपये, साच्यांची किंमत ४ ते ५ हजार रुपये इतकी आहे.
जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एकूण १५० कार्यशाळा असून, त्यामध्ये मूर्ती घडविण्याच्या कामाने वेग धरला आहे. परंतु, वाढलेला वाहतूक खर्च आणि गणेशमूर्ती तयार करण्यासाठी अन्य लागणाऱ्या साहित्याच्या वाढलेल्या किंमती, कारागारांची वाढलेली मजुरी या सार्या स्थितीमध्ये गणेशशाळा चालविणे आणि गणेशमूर्ती तयार करणे कारखानदारांना अवघड बनले आहे. त्याचा परिणाम म्हणून सर्वसामान्य जनतेला देखील गणेशमूर्तीच्या किमती वाढल्याने आर्थिक झळ बसणार आहे.