28.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriभाट्ये सुरूबनात दोघांवर टोळक्याचा हल्ला, नवविवाहित शस्त्राचे वार

भाट्ये सुरूबनात दोघांवर टोळक्याचा हल्ला, नवविवाहित शस्त्राचे वार

या हाणामारीत नवविवाहित तरूणासह त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.

८ दिवसांपूर्वीच लग्न झालेले मिरकरवाड्यातील नवविवाहित दांम्पत्य त्यांच्या मित्रासमवेत शुक्रवारी सायंकाळी भाट्ये सुरूबनात, समुद्रकिनारी फिरायला गेले असता अचानक आलेल्या गुंडांच्या टोळक्याने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार मिळताच त्या गुंडांनी शस्त्रे काढली आणि दोघांवर हल्ला चढविला. दोघांना बेदम मारहाण केली. या हाणामारीत नवविवाहित तरूणासह त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा प्रकार कळताच मिरकरवाडा आणि भाट्ये या दोन्ही परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रम ाणावर जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. त्यामुळे काही काळ तेथे तणावसदृश्य वातावरण होते.

नवविवाहित दांपत्य – जिल्हा रूग्णालयातील पोलिस चौकी आणि घटनास्थळावरून पत्रकारांना मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात राहणाऱ्या अल्तमस अहमद मस्तान (वय २७) या तरूणाचे ८ दिवसांपूर्वीच आयेशा (वय २५) या तरूणीशी लग्न झाले होते. नवविवाहित दांपत्य खूष होते.

भाट्यात फिरायला आले – अल्तमस अहमद मस्तान आणि आयेशा, अल्तमस मस्तान हे दांपत्य त्यांचा मित्र फाहिस समीर होडेकर (वय २५) याच्यासमवेत मोठ्या आनंदात भाट्ये सुरूबनात फिरण्यासाठी आले होते. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही तिघं तेथे आली.

थार गाडी आली – गप्पागोष्टी सुरू असतानाच अचानक त्यांच्यासमोर एक थार गाडी येऊन उभी राहिली. त्यातून ४ – ५ तरूण उतरले आणि त्यांच्याशी दादागिरीच्या भाषेत बोलू लागले. त्यांनी या नवविवाहित दांपत्याकडे पैसे मागितले. मात्र पैसे देण्यास नकार देताच वादावादी सुरू झाली. झटापट देखील झाली. शस्त्राचे वार अचानक त्या टोळक्यातील तरूणांनी त्यांच्याकडे असलेली शस्त्र बाहेर काढली आणि अल्तमसवर वार केले. त्याच्या डोक्यावर वार केल्याने रक्तस्त्राव झाला. तर फाहिस ला बेदम चोपण्यात आले. या प्रकारात ‘बिचारी आयेशा घाबरून गेली. तिने आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावले. लोकं धावत आली.

टोळकं पसार – लोकं येताच हे तरूणांचे टोळके आल्या गाडीतून तेथून निघून गेले. दरम्यान रक्तबंबाळ झालेल्या अल्तमस’ आणि बेदम मारहाणीने जखमी झालेल्या फाहिस या दोघांना स्थानिक लोकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. यामध्ये अल्तमसच्या डोक्याला मोठी जखम झाली असून टाके घालण्यात आले आहेत. तर फाहिस होडेकरला मुका मार लागला आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. आयेशा घाबरली आहे.

जिल्हा रूग्णालयात गर्दी – सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास भाट्ये सुरूबन येथे झालेल्या या प्रकाराचे वृत्त हळूहळू मिरकरवाड्यात पोहोचले. त्यानंतर लोकं मोठ्या संख्येने जिल्हा रूग्णालयात आली होती. भाट्येतील काही मंडळींनी देखील रूग्णालयात धाव घेतली. काही काळ रूग्णालयात तणावसदृश्य वातावरण होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळली. या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी परवानगी देताच त्यांचा जबाब आम्ही नोंदवून घेऊ, रात्रौ उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

कोण आणि का? – दरम्यान या घटनेने मिरकरवाडा परिसरात खळबळ उडाली आहे. गाडीतून आलेली ती मंडळी कोण होती आणि का आली होती? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते तरूणांचे टोळके कुठे पसार झाले? असाही सवाल उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular