एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ रत्नागिरीत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव तयार करून पाठपुरावा करावा. त्यासाठी जागा दिली जाईल, असेही सामंत यांनी सांगितले. पालकमंत्री सामंत यांनी जिल्ह्यात झालेला पाऊस, शेती, घर, गोठ्यांचे झालेले नुकसान, मनुष्यबळ हानी, प्रशासनामार्फत करण्यात आलेली मदत, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, महावितरण, धरणांची सद्यःस्थिती, खते, बी-बियाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, धोकादायक शाळा, अंगणवाडी नुकसान, पाणीपुरवठा, नद्यांतून गाळ काढणे, औषधसाठा, आरोग्य सुविधा, साकव, नगरपालिका प्रशासन, पोलिस विभाग याबाबतचा बारकाईने आढावा घेतला. ते म्हणाले, ६५ मि.ली.पेक्षा जास्त पाऊस झाल्यास नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने मदतीची कार्यवाही करावी.
आरोग्य विभागाने साथीचे रोग, सर्पदंश याबाबत औषधाचा साठा पुरेपूर राहील याची जबाबदारी घ्यावी. प्रलंबित शवविच्छेदन अहवाल तातडीने द्यावेत. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. कोकण रेल्वेने सर्व रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवली पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्या छतावरील गळके पत्रे तातडीने बदलले पाहिजेत. एसटी विभाग नियंत्रकांनी देखील बसस्थानके स्वच्छ राहतील. विशेषतः स्वच्छतागृहे नीटनेटकी राहतील याची खबरदारी घ्यावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खड्ड्यांची दुरुस्ती, चिखलाची साफसफाई करावी. महावितरणने वाड्यांचा सर्व्हे करून सिंगल फेज वरुण श्री फेजवर करण्याबाबत मिशन हाती घ्यावे, अतिधोकादायक, धोकादायक शाळांची यादी करा. त्याबाबतचा अहवाल द्या, असेही सामंत यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी फोन उचलावेत – पुढील चार महिने सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहायला हवे. अत्यावश्यक कारणाशिवाय आपत्कालीन परिस्थितीत रजेवर जाऊ नये तसेच मुख्यालय सोडू नये. बरेच अधिकारी फोन उचलत नाहीत. गायब असतात. अशावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांनी आलेला फोन उचलला पाहिजे, असेही पालकमंत्री म्हणाले.
आपत्कालीन परिस्थिती – धरण लाभ क्षेत्रात किती लोक राहतात, आपत्कालीन परिस्थितीमध्ये किती जणांचे स्थलांतर करावे लागेल, याबाबत नियोजन आतापासूनच करावे. दरडप्रवण क्षेत्राबाबतचेही नियोजन असावे. चांगल्या शाळा निवारा म्हणून वापरता येतील. त्याची तयारी करावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.