कोकणामध्ये गणेशोत्सवाची धामधूम काही औरच असते. अनेक चाकरमानी उत्सवासाठी आपल्या गावच्या घरी येतात. वर्षभर आधीच रेल्वेची येण्याजाण्याची तिकिटांचे आरक्षण करून ठेवतात. इतका चाकरमानी उत्साही असतात. परंतु, गणेशोत्सव काळामध्ये खाजगी बस गाड्यांच्या भाड्यामध्ये दुप्पट तिप्पट वाढ केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
या विषयाकडे गांभिर्याने लक्ष घालत गणेशोत्सव काळामध्ये जास्तीचे भाडे आकारणी केल्यास परिवहन विभागाकडून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अशा प्रकरणी संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व आरटीओंना देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांकडून दामदुप्पट भाड्याची रक्कम वसूल करणाऱ्या खासगी प्रवासी बस वाहतूकदारांना परिवहन विभागाने मर्यादेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची होणारी लूट नक्कीच थांबणार आहे.
सणाच्या काळात प्रवासी संख्या वाढणार हे गृहीत धरूनच ठराविक मार्गावरील मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळ दरवर्षी जादा बसेस उपलब्ध करून देते. महामंडळा सोबत या काळात खासगी बसेसही त्याच मार्गावरून जात असतात, परंतु त्यांच्यामार्फत जादा भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट केली जाते. कधी एकदा गावी पोहोचतो अशी अवस्था चाकरमान्यांची झालेली असते, काही वेळा हीच लोक सुद्धा जादा भाडे स्विकारून प्रवास करण्यास पसंती दर्शवितात.
शासनाने २०१८ मध्येच निश्चित केलेल्या दरपत्रकाप्रमाणे, गर्दीच्या हंगामात खासगी बसगाड्यांना प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही, असे ठरविण्यात आले होते. परंतु, तरीही खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून जादा भाडे आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ज्या ठिकाणाहून खासगी बसेस सुटतात, त्या ठिकाणापासूनचे किलो मीटरप्रमाणे भाडेदराचा तक्ता प्रसिद्ध करण्यात यावा. आणि तरीही अधिक दर आकारल्यान येत असेल तर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व आरटीओंना दिले गेले आहेत.