रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे पर्यटकांचा ओघ कायमच असतो. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक समुद्राचा आनंद लुटण्यासाठी कोकणातील पर्यटन स्थळाना भेटी देतात. पहिली पसंती हि कोकणातील स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यानाच दिली जाते. परंतु, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने, बेफिकीरीने पाण्यात उतरून अनेकदा काही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. काल सुद्धा सातारा कोरेगाव येथील रहिवासी गणपतीपुळे समुद्रावर आले असता, तेथील समुद्रात चार जण बुडाले. मात्र समुद्रकिनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्टच्या जेसकी बोटचालकांनी या चौघांचे प्राण वाचवले आहे.
ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश सुतार, शमाली सूर्यवंशी, मृदुला सूर्यवंशी व मंदी सूर्यवंशी अशी वाचवण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत. हे चौघेजण अति उत्साहात समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचवेळी पाण्याच्या खोलीमुळे ते गटांगळ्या खाऊ लागले आणि हात उंचावून वाचवण्यासाठी मदत मागु लागले, याचवेळी समुद्राकिनाऱ्यावर असलेल्या जेसकी बोट चालकांच्या लक्षात आले. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता जेसकी बोट चालकांनी आपली बोट खोल समुद्रात नेऊन आपली धाडसी कामगिरी करत त्या चार जणांना बाहेर काढले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
यावेळी गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने व गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक पवार यांनी ही पर्यटकांना वाचविण्यासाठी जेसकी बोट चालकांना मोलाची मदत केली. सुरक्षारक्षकानी या चार जणांना खोलवर पाण्यात जाऊ नका असा इशारा दिला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आपला अतिरेक व बेजबाबदारपणे खोल समुद्रात गेले. वेळीच या जणांनी जीवरक्षक व सुरक्षारक्षकांच्या सूचनेकडे लक्ष दिले असते तर कदाचित बुडण्याची वेळच आली नसती.
गेल्या अनेक दिवसांपासून गणपतीपुळे ग्रामपंचायतीने दहा जीवरक्षकांना कमी केल्याने जीवरक्षकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यातच केवळ दोन जीव रक्षकांना गेल्या दहा दिवसापूर्वी गणपतीपुळे ग्रामपंचायतीने समुद्रकिनाऱ्यावर कामगिरीसाठी तैनात केले आहे, मात्र एवढ्या मोठ्या समुद्रकिनार्यावर या दोन जीवरक्षक बुडणाऱ्यांना वाचविण्यात कमी पडू शकतात. त्यामुळे जीवरक्षकांची संख्या वाढविण्याची गरज आहे.