दिवाळीच्या सुट्टीत गणपतीपुळेसह किनारी भागातील पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाच्या महामारीच्या दोन वर्षानंतर मंदीचा फटका पर्यटन व्यवसायाला बसतोय कि काय अशी भिती व्यावसायिकांमध्ये पसरली होती. मात्र यंदाच्या पर्यटक भेटीमुळे पर्यटन व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून गणपतीपुळेत दररोज १५ हजाराहून अधिक पर्यटक दाखल होत होते. सुट्ट्या संपत आल्या असल्या तरी अजून तीन चार दिवस पर्यटकांची गर्दी राहील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे सर्वत्र बंदी घालण्यात आली होती. याचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही सुरक्षित पर्यटन स्थळांकडे फिरणार्यांचा ओढा होता, परंतु, त्यामध्ये कोकणातील ठिकाणांकडील ओघ कमी झालेला दिसून आला.
यंदा दिवाळीची सुट्टी देखील लागोपाठच्या सुट्ट्यांना जोडून आल्याने, फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांची संख्या पाहता मंदीमधून लोकं सावरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले आहे. दिवाळीचे पहिले तीन दिवस झाल्यानंतर साधारणपणे २७ ऑक्टोंबरनंतर पर्यटन स्थळांवरील गर्दी वाढू लागली. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, मुरुड, कर्देसह गुहागर किनारी पर्यटकांचा राबता अधिक होता. गणपतीपुळेत दिवसाला १५ हजाराहून अधिक पर्यटकांनी मंदिरात हजेरी लावल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
किनारी भागातील स्थानिक शहाळे विक्रेते, फेरीवाले, उंट-घोडे सवारी, जम्पिंग जेक, बोटींग सवारी, दुचाकी सवारी यासह हॉटेल, टपरी व्यावसायिकांना चांगलाच आर्थिक फायदा झाला आहे. गणपतीपुळेत मुंबई, पुणे, नाशिक यासह पश्चिम महाराष्ट्रातून अधिक जणं कुटुंबासह तर काही मित्र परिवारासह फिरण्यासाठी दाखल झाले होते.