रत्नागिरी चौथ्या स्तरामध्ये अनलॉक झाल्यानंतर, रत्नागिरी मध्ये पर्यटक यायला काही प्रमाणात सुरुवात झाली. गणपतीपुळे ग्रामपंचायतीने मधी पर्यटकांना राहण्यास खोली उपलब्ध करून न देण्याबाबत काढलेल्या फतव्यामुळे, हॉटेल व्यवसायिकांमध्ये नाराजी पसरली होती. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील लॉजिंग, हॉटेल व इतर लहान सहान व्यवसाय सुरू करू देण्यासाठी हॉटेल व्यवस्थापन संघटना, ग्रामपंचायत सदस्य व हॉटेल असोसिएशन यांच्यामध्ये चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये गणपतीपुळेत येणारे पर्यटक बंदमुळे माघारी फिरत असल्याने लवकरच हॉटेल व्यवसाय सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
पावसाळी वातावरणामध्ये अनेक जणांची पावले आपसूकच कोकणाकडे वळतात. परंतु, ज्यांची गावे कोकणात असतील त्यांचा वास्तव्याचा प्रश्न नसतो, पण जे फक्त कोकणचे सौंदर्य अनुभवायला पर्यटक म्हणून कोकणात दाखल होतात, आणि मग एखाद्या समुद्र किनार्यालगत वस्ती करून एखाद्या लॉज, हॉटेल किंवा काही जण होम स्टे मध्ये सुद्धा राहतात. पण सध्या कोरोनाच्या महामारीमुळे राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे, अजूनही अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसाय बंद ठेवण्याचे आदेश असल्याने, अनेक व्यावसायिक अडचणीत आले आहेत. शासनाने निर्बंध शिथिल काही प्रमाणात केले असल्याने, अजून राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत, मात्र तरीदेखील अनेक पर्यटनस्थळी पर्यटक उत्साहाने येत आहेत.
पर्यटनक्षेत्र म्हणून अनेकांची प्रथम पसंती असलेले गणपतीपुळे येथील पर्यटन व्यवसाय शासनाच्या नियमांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. गणपतीपुळे मंदिरच बंद असल्याने त्यावर आधारित परिसरातील स्थानिक व्यावसायिकांचे उदरनिर्वाहाचे साधनच बंद पडले आहे. याच पर्यटकांवर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यवसाय व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. एकीकडे शासनाकडून खाजगी व्यावसायिकांना बंदी घालण्यात आली आहे, तर दुसरीकडे एमटीडीसीमध्ये निवासी व्यवस्था अनेक ठिकाणी पर्यटकांना वास्तव्यासाठी खुली केली आहेत, स्थानिक खाजगी व्यावसायिकांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.