रत्नागिरीतील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे मागील पंधरा दिवस वीजेचा खेळखंडोबा सुरु असून स्थानिक व्यापाऱ्यांसह येणाऱ्या हजारो भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याला सुरुवात होणार असून, काही प्रमाणात विजेचा लपंडाव सुरु झाला आहे.
असह्य उन्हाळा त्यातच दुपारी आणि रात्रीच्या वेळेस विद्युत पुरवठा खंडीत होत आसल्याने व्यापाऱ्यासह पर्यटक कमालीचे त्रस्त झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह दूरदूरचे पर्यटक उन्हाळी सुट्टी म्हणून हजारोंच्या संख्येने इथे आलेले असताना विद्युत पारेखण कंपनीने मागील पंधरा दिवस विद्युत पुरवठा अनियमित करण्याचा जणू चंगच बांधला आहे. त्यातून संपूर्ण पंचक्रोशीत नाराजगी पसरली आहे. समविचारी मंचाचे लढाऊ राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी इशारा दिला आहे कि, या नाराजीचे पर्यवसान कधीही संतापात होऊन आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येऊ शकते.
याबाबत पुनसकर पुढे म्हणाले कि, उपलब्ध माहितीनुसार या विभागात अंदाजे ३४ हजार विद्युत मीटर धारक असून या अंतर्गत ७८ गावे येतात. वीज नसल्याने घरगुती व्यवसायांवर परिणाम झाला असून कँनिग व्यवसायाला आर्थिक फटका बसला आहे. लॉज मालकांना तसेच मंगल कार्यालयात ग्राहकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. काहींना भाड्याने जनरेटर आणून अधिकच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
ही परिस्थिती येत्या चार दिवसांत बदलली नाही तर येथील जनतेला एकत्रित करुन विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर ठाण मांडून बसावे लागेल असा इशारा संजय पुनसकर यांनी दिला आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग राहील असेही ते म्हणाले. गणपतीपुळे पर्यटन विकास अंतर्गत अनेक घोषणा लोकप्रतिनिधी करतात. पण वीज वितरण या मुलभुत सुविधेकडे लक्ष न देता जाणूनबुजून त्रास देतात. नियमित वीजबिले भरुनही व्यवसाय उद्योग उदीमावर परिणाम करुन चालविलेला हा छळवाद तात्काळ थांबवावा. या कचाट्यात सापडलेल्या ७८ गावाना समविचारी साथ देईल असा विश्वास पुनसकर यांनी दिला आहे.