गणपतीपुळे येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन पर्यटक समुद्रात बुडत असताना त्यांना जीवरक्षकांनी वाचवले. भूषण हेमंत अडसूळे वय २२ आणि हेमंत सीताराम अडसूळे वय ४७ रा. सांगली मिरज घनबाग येथील दोघेजण दुपारी समुद्रात पोहायला गेले असता ते बुडत होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात ओढले गेले आणि त्यांनी वाचविण्याकरिता आरडाओरडा केला. त्यावेळी जीवरक्षक रोहित माने, हेमंत महादेव, स्थानिक व्यावसायिक अक्षय सुर्वे उर्फ बंटी शरद मयेकर या सर्वांनी मिळून त्यांचा जीव वाचवण्याची यशस्वी कामगिरी केली.
त्या दोन पर्यटकांना गणपतीपुळ्यातील जीवरक्षकांनी बुडताना वाचवले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. गणपतीपुळे येथील जीवरक्षक देवदूतासारखे त्यांच्या मदतीला धावल्यामुळेच त्यांचे प्राण वाचले. बुडत असताना बचावलेले मिरज मधील दोघेही आता सुखरूप आहेत.
कोकणातील अथांग समुद्र अनेकांना भूरळ घालतो. पर्यटकही समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी येथे येत असताना. पण मोह न आवरल्याने समुद्रात जास्तीतजास्त आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. पण हीच बाब अनेकवेळा कोणतीही काळजी न घेतल्याने जीवावर बेतते, त्यामुळे नवीन ठिकाणी पर्यटनाला गेल्यावर याचे विशेष भान बाळगणे आवश्यक आहे. गणपतीपुळे समुद्रात अशे प्रकार पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अनेकदा घडत असतात.
मागीलच आठवड्यामध्ये गणपतीपुळे येथे आलेल्या पुण्यातील एका पर्यटकाला आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास समुद्रात बुडताना वाचवण्यात आले. सागर रक्षक दलाच्या सदस्याने त्याचा जीव वाचवला. गुलशन सुधाकर राठोड वय २८ असे या तरुणाचे नाव असून, तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील पानोला माहूर येथील आहे. सध्या तो पुण्यातील चाकण येथे एका कंपनीत काम करतो. गणपतीपुळे येथील सागर रक्षक दलाचे सदस्य शरद मयेकर यांच्या धाडसामुळे गुलशनचा जीव वाचला.

