कोकण आणि कोकणातील प्रसिद्ध देवस्थाने कायमच पर्यटकांसाठी आकर्षण ठरली आहेत. ४ फेब्रुवारी रोजी असणारा माघी गणेशोत्सव सोहळा अनेक ठिकाणी, गावागावात गणपतीची विधिवत स्थापना करून साजरा केला जातो. रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपती संस्थान आणि पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान माघी गणेशोत्सव साजरा करण्याचे योजिले आहे.
कोकणातील तसेच जगप्रसिद्ध असे श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांचेमार्फत २ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी २०२२ म्हणजे माघ शुद्ध प्रतीपदा ते माघ पंचमी या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. दिनांक २ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी पंचसूक्त सहित महा पूजेद्वारे उत्सवास प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीदिनी सहस्त्र मोदक अर्पण म्हणजेच सहस्रनाम तसेच दररोज सायंकाळी साडेसात ते रात्र साडेनऊ वाजता किर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे, तर ५ फेब्रुवारी रोजी ललिताच्या कीर्तनाने माघी गणेशोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
मागील वर्षी सगळ्याच सणासुदांवर कोरोनामुळे बंदी होती, त्यामुळे यावर्षी कोरोनाचा प्रभाव घटल्याने, यावेळी होणारा माघी गणेशोत्सव हा कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे व अटींचे काटेकोर पालन करून पार पाडण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम संस्थान श्रीदेव गणपतीपुळेचे विश्वस्त मंडळ व घनवटकर पुजारी यांचेमार्फत पार पाडले जाणार आहेत. या उत्सवाचे संपूर्ण नियोजन संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांचेमार्फत करण्यात आले आहे. तसेच उत्सवाच्या निमित्ताने येथील गणपती मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई संस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.