शहरातील मारुती मंदिर स्टेडियमच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगच्या जागेत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे हे पार्किंग बंद केले आहे. बाजूच्याच रिक्षा थांब्याजवळ व त्याच्या बाजूने असणाऱ्या गाळ्यांजवळ स्मार्ट शौचालय प्रस्तावित आहेत. यामुळे व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत या कामाला विरोध केला आहे. परिसरात पार्किंगचे आधीच हाल होत असताना ते बंद करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित केला. व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर हे काम तात्पुरते थांबविल्याचे नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी सांगितले. दरम्यान, स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात प्रभागनिहाय कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती ठेकेदार कंपनीकडून मागवल्याचेही सांगितले. रत्नागिरी शहरामध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत सुमारे ४०० कोटींची विकासकामे सुरू आहेत. रत्नागिरी शहर स्मार्ट होणार असल्याने नागरिकांचेही या प्रकल्पाकडे लक्ष लागून राहिले आहे. शहरातील मारुती मंदिर या मध्यवर्ती ठिकाणी मोठी बाजारपेठ निर्माण झाल आहे; परंतु तेथे कोणतीही पार्किंगची व्यवस्था नाही.
आधीच शहरात पार्किंगबाबत ओरड सुरू आहे. आंब्याच्या झाडाखाली आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या समोर पार्किंग करण्यात आले आहे; परंतु गेले दोन-तीन दिवस क्रीडांगणासमोरील चारचाकी पार्किंग बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरच गाड्या लावाव्या लागत आहेत. या जागेत स्मार्ट सीटीअंतर्गत वृद्धांना विरंगुळ्यासाठी आणि बसण्यासाठी बाकडी टाकून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, रिक्षा थांबा व त्या बाजूला असणारे गाळे हटवून त्या ठिकाणी स्मार्ट शौचालय उभे राहणार असल्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे येथील व्यावसायिक व दुकानदारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. मुळात मारुती मंदिरराजवळ पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे चारचाकी वाहनचालकांना गाड्या रस्त्यावर लावल्या तर पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे पार्किंग का हटविण्यात येत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
काही वर्षांपूर्वी या ठिकाणी पेव्हरब्लॉक बसवून निधी खर्च टाकण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या पैशांची अशी उधळपट्टी का केली जात आहे, असा प्रश्नही व्यापाऱ्यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या दर्शनी भागात प्रस्तावित शौचालय योग्य नसल्याची भूमिका व्यापारी व नागरिकांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे या ठिकाणी गाड्या लावणारे रिक्षा व्यावसायिक व खोकीधारकांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. रिक्षा थांबा पालिकेत नोंदणीकृत आहे. मग, त्यांना रस्त्यावर जागा देणार का, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. पार्किंग क्षेत्रात प्रस्तावित गार्डन तसेच प्रस्तावित शौचालय करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे परिसरातील व्यावसायिकांनी केली आहे.

