29.1 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeRatnagiriजयगडमध्ये गॅस प्रकल्पातून वायुगळती, ६१ विद्यार्थी गुदमरले!

जयगडमध्ये गॅस प्रकल्पातून वायुगळती, ६१ विद्यार्थी गुदमरले!

या गॅस प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असून देखील गॅस प्रकल्प सुरु आहे.

या वायुगळतीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास झाला. श्वास कोंडल्याने ते अक्षरशः लादीवर, गडबडा लोळत होते. त्यांची अवस्था पाहून अनेक ‘माऊलींना अश्रू अनावर झाले. सुदैवाने खाजगी वाहनचालकांनी प्रसंगावधान दाखवत या मुलांना आपल्या गाडीतून रुग्णालयात दाखल करण्यास पालकांना मदत केल्याने अनर्थ टळला. नेमके काय झाले? याविषयी पोलिस तसेच परिसरात राहणारे नागरिक आणि रुग्णालयात आलेल्या मुलांच्या पालकांकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार गुरुवारी दुपारी १२.३० वाजता अचानक वायुगळती सुरू झाली. तालुक्यातील जयगड येथील माध्यमिक विद्यामंदिर जयगड, कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयानजीक एल.पी. गॅसची गळती होऊन मोठी दुर्घटना घडली. ही वायुगळती नेमकी कशी झाली याविषयी अधिकृतपणे कोणतीच माहिती मिळाली नाही. मात्र गॅस प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या टाक्या फुटल्या आणि त्यातून पसरलेल्या वायूमुळे अनेक विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला, या वायुमुळे अनेक विद्यार्थी गुदमरले अशी चर्चा सुरू आहे. शाळेपासून २५ ते ३० मीटर अंतरावर हा गॅसचा प्रकल्प असून ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला असताना हा प्रकल्प आजही सुरुच आहे असे अनेक ग्रामस्थांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

शाळा सुरु – या प्रकल्पातून निर्माण होणारा गॅस ज्या ठिकाणी टँकरमध्ये भरला जातो तेथून अवघ्या काही मिनिट अंतरावर माध्यमिक विद्यामंदिर जयगड ही शाळा आहे. दुपारी सर्व विद्यार्थी शाळेत बसले होते आणि अचानक वायूचे लोट शाळेपर्यंत आले. बघता बघता संपूर्ण शाळाच या वायूने भरुन गेली.

विद्यार्थी गुदमरले – विद्यार्थी शाळेत शिकत असतानाच दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अचानक वायूचे लोट शाळेपर्यंत आले आणि शाळा वायूने भरुन गेली. शाळेतील अनेक विद्यार्थी या वायूने गुदमरुन गेले. जो तो सैरावैरा पळू लागला. नेमकं काय घडलं? ते कोणालाच कळत नव्हतं.

आकांडतांडव – अचानक शाळेपर्यंत वायू गळतीचे लोण पोहचल्यानंतर शाळेतून किंकाळ्यांचे आवाज येवू लागले. विद्यार्थी गुदमरल्याने अनेक विद्यार्थी लादीवरच बेशुद्ध अवस्थेत पडले. शिक्षकांची तर बोबडीच वळली. साऱ्यांनीच एकच आकांडतांडव केला.

पालक धावले – गॅस गळतीमुळे विद्यार्थी गुदमरल्याची माहिती जयगड पंचक्रोशीत पसरली आणि बघता बघता सारे पालक शाळेच्या दिशेने धावले. जो तो आपल्या पाल्याला शोधत होता. विद्यार्थी गुदमरुन लादीवर तडफड़त असल्याचे पाहून अनेक पालकांनी टाहो फोडला.

मिळेल त्या वाहनात भरले – वायुमुळे श्वसनास त्रास होऊ लागल्याने विद्यार्थी तडफडत होते. अशावेळी पालकांनी रस्त्यावर मिळेल ती गाडी थांबविली आणि नजीकचे रुग्णालय गाठले. खाजगी वाहनचालकांनी माणुसकी दाखवत शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांना हलविण्यासाठी वाहनांच्या रांगा लावल्या होत्या.

श्वसनाचा त्रास – मिळालेल्या माहितीनुसार, गॅस गळतीमुळे सुमारे ६१ विद्यार्थ्यांना अचानक श्वसनाचा त्रास सुरु झाला. काही विद्यार्थी तर लादीवर गडाबडा लोळत होते. या सर्व विद्यार्थ्यांना विविध वाहनांमधून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. काही विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयातही दाखल करण्यात आले असल्याचे कळते.

२ विद्यार्थीनी अतिदक्षता विभागात – या दुर्घटनेत एकूण ६१ विद्यार्थ्यांना वायूची बाधा झाली आहे. या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामध्ये दोन विद्यार्थीनी गंभीर असून. दोषींना अतिदक्षता विभागात अधिक उपचाराकरीता दाखल केले आहे.

ग्रामस्थ आक्रमक – या घटनेनंतर जयगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. या गॅस प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असून देखील गॅस प्रकल्प सुरु आहे. या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. त्याला सर्वस्वी जबाबदार कंपनी असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना केला.

अधिकारी आलेच नाहीत – संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला.. एवढी मोठी दुर्घटना घडली पण दुर्घटनास्थळी कंपनीचा एकही बडा अधिकारी आला नाही, ना कोणती मदत कंपनीकडून मिळाली, असा आरोप काही ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना केला. अनेकांनी याविषयी संताप व्यक्त केला.

जाब विचारणार – हा गॅस प्रकल्प आमच्या जीवावर उठणार आहे. मच्छीमारांनी तर या आधीच त्याला विरोध केला होता. मात्र सर्व विरोध झुगारुन हा गॅस प्रकल्प सुरु करण्यात आला. उद्या शुक्रवारी जयगड ग्रामस्थ कंपनी अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याची माहिती संतप्त ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हा प्रशासन धावले – या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक घटनास्थळी गेल्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक शंकर बर्गे, प्रांत अधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे आदींनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. विद्यार्थ्यांची विचारपूस करीत डॉक्टरांना उपचाराबाबत त्यांनी सूचना केल्या.

बाधित विद्यार्थ्यांची नावे – आर्या केतन पोवार रा. पेठवाडी जयगड, पूर्वी सुहास सावंत रा. जयगड बौद्धवाडी, राहियान रुकुद्दीन टेमकरे रा. अकबर मोहल्ला जयगड, पेक्षा गुरुनाथ आढाव रा. संदखोल जयगड, तन्वी रविंद्र भवर, सहारा शेखर जाधव, अरोही ऊमेश सावंत, रिशा संजय परकल, मुर्बा मुबी राजवडकर, आरोशी विशान खोड, स्वरा. संदेश जाधव, भूमी श्रीधनकर, सामर्थी संदिप मोहीते, दुर्वा. श्रीधनकर, आरुशी विशाल खाडे, मुबाऊद्दीन राजवाडकर, साक्षी महेंद्र. गोताड, मुश्रीदा जावेद टेमकर, अर्या कैलास सुर्वे, जुबीया तय्यब बंगाली, रीझा रियान वाडकर, नजीफा मोहसीन नरंवणकर, रिया राजेद्र चोरगे, सायली दिपक भुवड, तन्वी. प्रताप सुर्वे, सुरक्षा पांडुरंग बेनेरे, रुशा संजय परकर, मुस्कान मोहसीन गुहाघरकर, माझीया बावटे, श्रावणी भोळ, श्रुती चिचकर, ग्रंथा राकेश पवार, साबीरा घोडेकर, अस्मिता भार्गव पाष्टे, अंकीता गणेश मयेकर, सैनिन जुबेर सांगरे, स्वरा महेंद्र गोताड, कृपा श्रीपाद परकर, मुबसिरा चौघुले, श्रावणी गुरव, रुमाना पीराजधी, सुरभी सुभाष कावळे, दिया घवाळी आदींना रुग्णालयात दाखल केले आहे तर काहींना उपचार करुन घरी सोडण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular