28.1 C
Ratnagiri
Friday, April 25, 2025

राजापूर आगारासमोर अजूनही संभ्रमावस्था!

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर एसटी डेपोसमोर 'भुयारी मार्ग...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हितासाठी आक्रमक आंदोलन करावे लागेल : उदय बने

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका त्वरित घ्याव्यात,...
HomeRatnagiriविहिरीत पडलेल्या गवारेड्याला दिले जीवदान

विहिरीत पडलेल्या गवारेड्याला दिले जीवदान

संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावी एका विहिरीत पडलेल्या गवा रेड्याला वनविभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जीवदान दिले. ७ ते ८ वर्षाचा हा गवारेडा असून मुक्तता होताच त्याने जंगलात (नैसर्गिक अधिवासात) धूम ठोकली. त्याला कोणतीही इजा झाली नव्हती. याबाबत वनपाल न्हानू गावडे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, ६ जून रोजी सायंकाळी ६ वा.च्या सुमारास कोसुंब गावचे माजी सरपंच किरण जाधव यांनी गावडे यांना कोसुंब गावातील गुरववाडीतील प्रकाश राजाराम पांचाळ यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये गवारेडा पडला असल्याची खबर दिली. खबर मिळताच न्हानू गावडे यांनी परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार यांना कळविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावडे वनविभागाच्या अन्य कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. ज्या विहिरीत हा गवारेडा पडला होता ती विहीर नव्याने खोदण्यात आलेली होती. त्या विहिरीची उंची कमी आहे त्यामुळे विहिरीच्या शेजारी पहारीने खोदकाम करण्यात आले.

विहिरीत दगड व माती टाकून गवारेड्याला बाहेर येण्यासाठी मार्ग तयार केला. अपेक्षेप्रमाणे त्या मार्गावरून बुधवारी रात्री ८.३० वा. गवा स्वत: हून विहिरीच्या बाहेर आला. त्याला कोणतीही दुखापत झालेली नव्हती. बाहेर पडताच त्याने जंगलात धूम ठोकली. (तो सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात निघून गेला.) नरजातीचा हा गवारेडा असून त्याचे वय ७ ते ८ वर्षे असावे. विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, देवरूखचे वनपाल न्हानू गावडे, फुणगूसचे वनरक्षक राजाराम पाटील, वनरक्षक आकाश कडूकर, अरूण माळी यांच्यासह वन्यजीवप्रेमी दिलीप गुरव, अनंत तोरस्कर, कोसुंबचे किरण जाधव, रोहित जाधव, अजित पांचाळ, पांडुरंग पंडित, संजय पांचाळ, मोहन जाधव, दत्ताराम पांचाळ, प्रकाश पांचाळ, महेश पंडित, अनिकेत मोरे यांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. दरम्यान, मानवी वस्तीमध्ये एखादा वन्यप्राणी आढळल्यास किंवा संकटात सापडला असल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रम क १९२६ या क्रमांकावर किंवा वन अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular