27.2 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeRatnagiriपोलिसांच्या तावडीतून निसटलेल्या आरोपीला अखेर मुसक्या आवळल्या

पोलिसांच्या तावडीतून निसटलेल्या आरोपीला अखेर मुसक्या आवळल्या

पोस्को कायद्या अंतर्गत अटक करून तपास कामी पोलीस घेऊन गेले असता घटनास्थळारून पसार झालेला संशयित आरोपी संदीप बापू शेळके याला अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पेढांबे येथील जंगलातूनच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्यावर आणखी एक अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लग्न केल्याच्या आरोपाखाली संदीप बापू शेळके याच्यावर बालविवाह तसेच पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. संशयित आरोपी म्हणून त्याला अटक देखील करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी संदीप शेळके याला सोमवारी दुपारी घटनास्थळी पोलीस घेऊन गेले होते. यावेळी पंचासमक्ष जाबजबाब घेत असतानाच त्याने संधी साधली आणि पोलिसांना गुंगारा देत घराच्या मागील बाजूतून पळ काढत थेट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही.जंगलात शोधमोहीम दरम्यान पोलिसांनी पेढांबे तसेच कोळकेवाडी जंगलात जोरदार शोध मोहीम राबवली होती. तसेच रत्नागिरी येथून श्वान पथकाला पाचारण करून त्यांची मदत देखील घेण्यात आली होती. संशयित आरोपी चिपळूणच्या बाहेर जाऊ नये म्हणून रेल्वे स्थानक, एसटी स्टँड व कुंभार्ली चेकपोस्ट अशा महत्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. प्रभारी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके अहोरात्र या शोध मोहिमेत व्यस्त होती. अखेर दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर तिसऱ्या दिवशी पोलिसांच्या सर्च मोहिमेला यश आले. पेढांबे येथील जंगलात सापळा रचून पोलिसांनी संदीप शेळके याला जेरबंद केले.

या शोध मोहिमेत प्रभारी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दीपक ओतारी, अमोल यादव, गणेश शिंदे, नाना वाघमारे, गव्हाणे यांच्यासह शिरगाव अलोरे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली होती. दरम्यान संशयित आरोपी संदीप शेळके याच्यावर आणखी एक अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाल्याप्रकरणी त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून यापूर्वी अल्पवयीन मुलीशी विवाह, तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार असे दोन गुन्हे दाखल आहेत. तर आता तिसरा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular