नवीन बाणकोट-बागमांडला सीलिंक पुलासाठी भूमापन व भूवैज्ञानिक तपासणी प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे बाणकोट-बागमांडला हा मार्ग खाडीपुलाने अखेर जोडला जाईल, अशी आशा पुन्हा निर्माण झाली आहे. सावित्री खाडीवर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून बांधण्यात येणारा नवीन बाणकोट बागमांडला सी लिंकचे कामाचे कंत्राट अशोका बिल्डकॉन कंपनीला मिळाले आहे. पुलाच्या कामाचे अंदाजपत्रक सुमारे ३१० कोटी रुपये आहे. रत्नागिरी आणि रायगड दोन जिल्ह्यांना जोडणारा व शासनाचे अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या बाणकोट खाडीवरील पुलाची भूवैज्ञानिक तपासणी सुरू झाली आहे.
तीन वर्षांत दीड किमी पुलाचे काम पूर्ण करून २०२८ पर्यंत पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सावित्री नदीवरील बाणकोट खाडीवरील हा पूल बाणकोट वेसवी (रत्नागिरी) आणि बागमांडला (रायगड) या दोन जिल्ह्यांना जोडणार आहे. हा मार्ग रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाचा एक भाग आहे. रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गावर सात सागरी सेतू बांधण्यात येणार आहेत. त्यातील दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाकांक्षी पूल आहे.
जुन्या प्रकल्पाचे दोनशे कोटी पाण्यात – सागरी महामार्गासाठी सध्या होऊ घातलेल्या बाणकोट-बागमांडला सागरी पुलाच्या अगदी जवळ २०१२ मध्ये सागरी पुलाच्या केबल स्टे हे प्रकल्पाचे काम सुरू केले होते. सुमारे ३० ते ४० टक्के पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर या पुलाचे काम अर्धवट आहे. मात्र ते काम तसेच सोडून पुलाची नव्याने प्रक्रिया सुरू झाली. या कालावधीत जुन्या पुलाच्या कामांसंदर्भात कोणताही माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे पुलाच्या निर्मितीकरिता केलेले सुमारे दोनशे ते अडीचशे कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेल्याची चर्चा सुरू आहे.