प्रेमामध्ये माणूस आंधळा होतो, आजू बाजूला चाललेल्या कोणत्याच गोष्टीकडे त्या प्रेमवीराचे लक्ष नसते. केवळ प्रेमाच्या आभासी दुनियेमध्येच जगणे अशा लोकांचे सुरु असते. प्रेमामध्ये कोण काय पाउल उचलेल हे काही सांगता येत नाही. अनेकवेळा एकतर्फी प्रेमामध्ये काहीतरी विपरीत घडण्याचे प्रमाण जास्त आढळून येते. पण प्रेमामध्ये अतीव बुडालेल्या अल्पवयीन मुला मुलीना प्रेमामध्ये मिळालेला धक्का पचविणे कठीण जाते. पुढचा पाठचा काहीच विचार न करता मग ती मुले आत्महत्येसारख कठोर पाउल उचलतात.
लांजा येथे मामाच्या घरी राहण्यासाठी आलेल्या मुलीने प्रेमप्रकरणातून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली. युक्ता राजेश कोतापकर रा. वरळी मुंबई हिचे शेजारी राहणार्या योगेश जाधव वय २१ याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले होते. युक्ता ही ४ जानेवारी रोजी लांजा वाकेड येथील मामाच्या घरी राहण्यासाठी आली होती.
मुंबई येथे राहणार्या प्रियकराबरोबर तिचे बोलणे चालू असायचे. मात्र एकदिवस तिने प्रियकराला लग्नाविषयी विचारले. मात्र प्रियकराने लग्नास नकार दिल्याने युक्ता हिने टोकाचे पाऊल उचलले. २७ जानेवारी रोजी तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. नातेवाईकांनी तिला प्राथमिक उपचारासाठी लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची तब्येत अधिकच बिघडल्याने मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना काल तिचा मृत्यू झाला.
प्रेम, भावना, गुंतणूक, लग्न यांसारख्या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुले लवकर फसतात आणि जर ते प्रेम यशस्वी झाले नाही तर मग अशी टोकाची पाउले उचलतात.