लोकसभेत जे झाले ते वास्तव मला माहिती आहे. माझी भावना सुडाची नाही; पण जिल्ह्यातील पाचही विधानसभा जागाबाबत माझी नो कॉमेन्टस् दावे कोणीही करतील. आता महायुतीची सत्ता आणायची आहे. हेवेदावे चालणार नाहीत. समजसपणा दाखवून विधानसभेत चांगला परिणाम दाखवून देऊ, असा आत्मविश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला आणि भविष्यातील विधानसभा महायुती म्हणून लढणार असल्याचे संकेत दिले. महाअधिवेशनानंतर भाजपच्या पत्रकार परिषदत राणे म्हणाले, “भारतीय जनता पार्टीचे केंद्र, राज्यात सरकार आहे. विविध योजना या सरकारने दिल्या.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, अन्नधान्य, लाडकी बहीण योजना, महिलांना प्रवासात सूट आदी योजनांचा यामध्ये समावेश आहे. १० वर्षांमध्ये अनेक विकासकामे केली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला लोकसभेला दिलासा मिळाला; परंतु रत्नागिरी जिल्ह्यात जाणवला नाही तो आता यापुढे जाणवेल.” लोकसभेत मुस्लिम समाजाने विरोधात केलेल्या मतदानाबद्दल राणे म्हणाले, “आम्ही कधीही जातीभेद केला नाही. काही लोकांनी गैरसमज पसरवला. मुस्लिम बांधवांना घेऊन सलोख्याने पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधक टीका करत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने गाजर असल्याचा आरोप होत आहे.” यावर राणे म्हणाले, ‘आतापर्यंत जेवढ्या योजना दिल्या त्याची काटेकोर अंमलबजवणी सुरू आहे. ज्या जाहीर झाल्या त्याचीही होणार. गेल्या अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे होते. काय दिले सरकारने जनतेला त्यांना दरडोई उत्पन्न, जीडीपी म्हणजे काय कळते का, ज्या भाषेत विरोधक बोलत आहेत यावरून त्यांचा दर्जा खालावल्याचे स्पष्ट दिसत आहे; परंतु भाजपचा दर्जा सुधारत आहे. खासदार झाल्यानंतर कोकणात केंद्र शासनाच्या माध्यमातून उद्योग आणि नोकऱ्या आणण्यावर प्राधान्य देण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.”