राजापूर शहरातील बौद्धवाडी परिसरात राजापूर पोलिसांनी धडक कारवाई करत क्रेटा कारमधून गोवा बनावटीची दारू जप्त केली. या कारवाईत सुमारे १ लाख १५ हजार ९२० रुपये किमतीची दारू आणि पाच लाख रुपये किमतीची क्रेटा कार असा एकूण ६ लाख १५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रोहित अंबाजी इंगळे (रा. बंगलवाडी, राजापूर) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक व विक्री वाढल्याच्या तक्रारी असताना पोलिसांनी ही कारवाई केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
गोपनिय माहितीच्या आधारे बौद्धवाडी परिसरात उभी असलेल्या क्रेटा कारची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीची दारू भरलेले ६७ बॉक्स आढळून आले. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, दिपज्योती पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी अनिल केसकर, प्रथमेश वारिक, डिगंबर शेलार आणि वाहनचालकै हर्षद मुल्ला यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५२/२०२५ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (इ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

