पश्चिम रेल्वेच्या वसईरोड स्थानकाहून कोकण रेल्वेमार्गावर वसई सावंतवाडी पॅसेंजर किंवा या मार्गावरील दिवंगत मधू दंडवते एक्सप्रेस सुरू करावी अशी वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी केली आहे. केंद्रातील शासन बदलले तरी जर कोकण रेल्वे दाक्षिणात्य राज्यांच्या सरबराईसाठी असेल तर राज्यातील खासदारांना मत मागण्याचा अधिकार नाही असे निक्षून बजावण्यात आले आहे. कोकण रेल्वेच्या उभारणीत महाराष्ट्र राज्याने सर्वात जास्त २२ टक्के गुंतवणूक करूनही महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला फक्त तीनच रेल्वे आल्या तर सात टक्के गुंतवणूक करणा-या गोव्याला ११ रेल्वे, १५ टक्के गुंतवणूक करणाऱ्या कर्नाटक राज्याला सहा रेल्वे, सहा टक्के गुंतवणूक करणा-या केरळला तब्बल २३ रेल्वे तर कोणतीही गुंतवणूक न करणाऱ्या तामिळनाडूला सात रेल्वे नेहमीसाठी मिळालेल्या आहेत.
कोकण रेल्वेचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कोकणातील भूमिपूत्रांनी स्वतःच्या वडिलोपार्जित जमिनी कोकण रेल्वेला दिल्या. त्याच कोकणाला तुतारी एक्सप्रेस, दिवा सावंतवाडी पॅसेंजर व दिवा रत्नागिरी पॅसेंजर अशा तीनच रेल्वे मिळाल्या आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कोकण रेल्वेच्या २५ वर्षाच्या नंतरही आज कोकणी माणून कोकण- रेल्वेतून शेळ्या-मेंढ्यांसारखा प्रवास. ‘करत आहे. ज्या महाराष्ट्र राज्याने कोकण रेल्वेत ‘सर्वाधिक २२ टक्के गुंतवणूक केली त्याला काय मिळाले? मग कोकण रेल्वे नेमकी कोणासाठी ? फक्त नाव कोकण रेल्वे फायदा दक्षिणेतील राज्यांना.
कोकण रेल्वेचा महाराष्ट्राला फायदा काय असा संतप्त या सवाल प्रवासी संघटनेने केला आहे. या निवेदनाच्या प्रती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पश्चिम व मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, स्थानिक खासदार विनायक राऊत, बोरिवलीचे खासदार गोपाळ शेट्टी, पालघर खासदार राजेंद्र गावित, रायगड खासदार सुनिल तटकरे, माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिलेली आहेत. या निवेदनावर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक, सेक्रेटरी यशवंत जड्यार व असंख्य चाकरमान्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.