शहरातील छत्रपती नगर येथे कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी बंद बंगला फोडून धाडसी चोरी केली. यामध्ये सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजाराची रोकड असा १० लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला. अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी हसिना अन्वर काझी (वय ६०, रा. छत्रपतीनगर, समर्थमठ, साळवीस्टॉप, रत्नागिरी) यांचा छत्रपती नगर येथील आगाशे मॉलच्या मागच्या बाजूला व अरमान बिल्डिंगसमोर हा बंगला आहे. या बंगल्यात धाडसी चोरी झाल्याचे उघड झाले. चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून ही चोरी करून पोबारा केला. शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना सकाळी घर उघडे दिसले. त्यामुळे त्यांना संशय आला व त्यांनी फोन करून घरमालक हसिना काझी व त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. ते सर्वजण आल्यावर त्यांना धक्काच बसला कारण, त्यांच्या बंगल्यात चोरी झाली होती. त्यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फोन करून खबर दिली.
तातडीने पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, फॉरेन्सिक टीमनेही ज्या कपाटातून दागिने व रक्कम गेली त्याची पाहणी केली असता ४ लाख ६ हजार ५८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ३ लाख २९ हजार रुपयांचे ४७ग्रॅमच्या बांगड्या, १ लाख ७५ हजार किमतीचे २५ ग्रॅम वजनाची कुडी, ३.५ ग्रॅम वजनाची २४ हजाराची एक अंगठी आणि ४० हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी पळवली. चोरट्यांचे ठसे मिळवण्याचे व काही पुरावे शोधण्यात आले. हसिना कांझी यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. रमेशनगरमध्ये प्रयत्न छत्रपती नगर येथे बंगला फोडून १५ तोळे सोने आणि रोख रक्कम लंपास केल्यानंतर चोरट्यांनी आणखी एक बंगला फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा बंगला फोडण्यात चोरट्यांना यश आले नाही. शहरातील रमेश नगर येथे बंगला फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.