आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ४ लाख २६ हजार कुटुंबांतील १६ लाख २८ हजार लाभाथ्यर्थ्यांपैकी ५ लाख ३६ हजार लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड तयार झाले आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य आणि योजना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी एक विशेष कार्ड दिले जाते, त्याला गोल्डन कार्ड म्हणतात. या कार्डाच्या साह्याने प्रतिकुटुंब ५ लाखांपर्यंत उपचार तसेच शस्त्रक्रिया मान्यताप्राप्त रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या सूचनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग तसेच इतर विभागाच्या समन्वयाने रत्नागिरी जिल्ह्यात गोल्डन कार्ड काढण्याची विशेष मोहीम राबवली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील १० लाख ९२ हजार लाभार्थ्यांकडून अद्यापही आयुष्मान कार्ड (गोल्डन कार्ड) काढलेले नाही. त्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी सांगितले आहे. नागरिकांनी जवळील आशा किंवा आपले सरकार केंद्र, ग्रामपंचायतमधील केंद्रचालक यांच्याद्वारे आपली केवायसी करून घेणे आवश्यक आहे. ई -केवायसीसाठी आधार कार्ड संलग्न मोबाईल नंबर तसेच अपडेटेड रेशन कार्ड आवश्यक आहे. आपले नाव यादीमध्ये दिसत असल्यास केवायसी पूर्ण करून घेऊ शकतो तसेच स्वतःदेखील आयुष्यमान अॅपद्वारे आपली केवायसी अँड्रॉईड फोनच्या मदतीने करू शकतो. अधिक माहिती www.jeevandayee.gov.in व www.pmjay.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व प्रक्रिया – अंतोदय, पिवळे, केशरी, पांढरे रेशन कार्डधारक असावा. आशावर्कर, कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार केंद्र, रुग्णालयातील मित्राकडे तसेच स्वतः लाभार्थी काढू शकतो.
ऑनलाईन १२ अंकी रेशन कार्ड नंबर, आधार कार्ड व त्याच्याशी संलग्नित मोबाईल नंबर, स्वतः लाभार्थी.
योजनेंतर्गत ३४ स्पेशालिटीमध्ये कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, बालरोग, स्त्रीरोग, नेत्रशस्त्रक्रिया (मोतीबिंदू वगळून), सांधेरोपण इत्यादीवर १ हजार ३५६ गंभीर आजारांवरती प्रतिकुटुंब ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळेल.