बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग लांजाने धडक मोहीम हाती घेतली असून बुधवारी २६ एप्रिल रोजी सकाळी तालुक्यातील वाटूळ – दाभोळे मार्गावरील कोर्ले येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग लांजाने धडक कारवाई करत तब्बल २४ लाख ४६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग लांजाने दिलेल्या माहितीनुसार, गोव्याहून मुंबईच्या दिशेने गोवा बनावट दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्क विभाग लांजाला मिळाली होती. त्यानुसार या विभागाने तालुक्यातील वाटूळ – दाभोळे मार्गावरील कोर्ले येथे बुधवारी २६ एप्रिल रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अशोक लेलँड दोस्त टेम्पो (एम.एच. ०२. एफ जी ५४८६) हा तपासणीसाठी थांबविला. यावेळी अधिक तपासणी केली असता टेम्पोच्या मागील बाजूस हौद्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा आढळून आला.

यामध्ये गोवा बनावटीच्या इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीचे १५ लाख ३६ हजार रुपये किंमतीचे १८० मिला मापाचे २०० खोके आढळून आले. तसेच ९ लाख रूपये किंमतीचा टेम्पो व १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण २४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग लांजाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. याप्रकरणी टेम्पो चालक विशाल रघुनाथ तुपे, रा. खेराडे तुपेवाडी (विटा), ता. कडेगाव, जि. सांगली याला अटक करण्यात आली असून – त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ कलम ६५ अ, ई. ८१, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अंमलबजावणी व दक्षता संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये तसेच कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त बी.एच.तडवी, अधीक्षक एस.के. धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा विभागाचे निरीक्षक व्ही. एस. मोरे यांनी केली. याकामी त्यांना दुय्यम निरीक्षक सुधीर भागवत, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विजय हार्तिसकर, वाहन चालक संदीप विटेकर यांचे सहकार्य लाभले. याबाबत अधिक तपास निरीक्षक व्ही. एस. मोरे हे करीत आहेत.