बारसू रिफायनरी प्रोजेक्टला सुरू असलेला विरोध शिंदे सरकारला बळाचा वापर करून मोडीत काढायचा आहे. मात्र, घाबरून जाऊ नका. शिवसेना तुमच्यासोबत आहे. वेळ पडली, तर मुंबईतली अख्खी शिवसेना बारसूमध्ये उतरवू, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे खासदार विनायक राऊत यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाने बारसू प्रकल्पाविरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सरकार गडगडणार आहे. त्यामुळे यापूर्वी शेवटचा हात धूवुन घ्यावा यासाठी शिंदे सरकार बारसू येथे येणाऱ्या कंपनीकडून लाच घेऊन हा प्रकल्प राबवत आहे. असा आरोपही विनायक राऊत यांनी केला आहे. रत्नागिरी येथे प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. विनायक राऊत म्हणाले, बारसू येथे होणाऱ्या मोर्चात आम्ही सहभागी होऊ. फडणवीस कर्नाटकातून अकलेचे तारे तोडत आहेत. त्यांना म्हणाव तेच हेलिकॉप्टर घेऊन येथे या. हा प्रकल्प राज्यसरकारचा आहे कि रत्नागिरीच्या एसपींचा आहे? जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यावर एसपी उत्तर देत होते.

कर्तव्याचे पालन करताना राजकारणाचा बळी होऊ नका, असे म्हणत विनायक राऊतांनी रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांना टोला लगावला आहे. या प्रकरणावरून आता खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या जमिनींसाठी कोकणातील नागरिकांनी सरकार विरोधात आंदोलन छेडले आहे. त्या आंदोलनाची दखल न घेता सरकारकडून हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका विनायक राऊत यांनी. केली आहे. बारसू आंदोलनावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, उन्हात ज्या प्रकारे आंदोलन होत आहे. त्या आंदोलनाची सरकारकडून दखल न घेता ते चिरडून टाकण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. येथील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हे आंदोलन लोकशाही पद्धतीन केले आहे. तरीही सरकारकडून मात्र आंदोलनातील नागरिक आणि महिलांना दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक देत आहे अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली आहे.