कोरोना काळापासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण निर्माण झालेला आहे. परंतु, कोणत्याही रुग्णावर उपचार करण्यासाठी अशा अयोग्य पद्धतीचा वापर करणे अयोग्य आहे. मुंबई गोवंडीमध्ये एका रुग्णालयाबाबत एक भयंकर प्रकार समोर आला असून, त्यामध्ये एका दुर्दैवी २ वर्षाच्या मुलाला जीव गमवावा लागला आहे.
गोवंडीमधील शिवाजीनगर परिसरात २ वर्षांच्या ताहा खान नावाच्या लहान मुलाला चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. ताह खान याची तब्ब्येत ठीक नसल्याने त्याच्या आई वडिलांनी त्याला उपचारासाठी नूर रुग्णालयमध्ये दाखल केले होते. दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज देत असताना रुग्णालयातील नर्सने सफाई काम करणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीला ताह खानला इंजेक्शन देण्यासाठी सांगितले होते.
आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच ताहा खान याचा मृत्यू ओढावला. संताप आणणारी बाब म्हणजे दोन वर्षाच्या या लहानग्याला नर्सिंग होममधील १६ वर्षांच्या सफाई काम करणाऱ्या मुलीला इंजेक्शन द्यायला सांगण्यात आले होते. या बेदरकार व निष्काळजीपणामुळे दोन वर्षाच्या ताहा खान याला आपले प्राण गमवावे लागले.
ताहा खानच्या वडिलांनी रुग्णालयातील अधिकारी, नर्स आणि सफाई कामगार यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्ताफ अब्दुल हसन खान, व्यवस्थापक नसिमुद्दीन सय्यद, परिचारिका सलीम ऊन्नीसा खान आणि त्या अल्पवयीन सफाई कर्मचारी मुलीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर हे चारही आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. अशा प्रकारे सफाई कामगाराच्या १६ वर्षीय मुलीला इंजेक्शन देण्यास सांगितले म्हणजे असे प्रकार तिथे वरचेवर घडत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.