राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील जुन्या विभागीय ग्रंथालयांपैकी एक असणाऱ्या रत्नागिरीतील टिळक मेमोरियल ग्रंथालय अद्ययावत व नुतनीकरण्यासाठी चार कोटी तर टिळक आळी येथील टिळक स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कार्यक्रम रत्नागिरीतील शासकीय विभागीय ग्रंथालय, टिळक स्मारक मंदिर येथे पार पडला. या नंतर पत्रकारांशी बोलताना नाम. सामंत म्हणाले कि, सध्या टिळक स्मारक पर्यटकांसाठी बंद आहे. पुरातत्त्व विभागाने तात्पुरती रंगरंगोटी आणि स्वच्छता मोहीम राबवली आहे. पुरातत्त्व खात्याने राज्य संरक्षित स्मारक म्हणून टिळक जन्मभूमी मूळ स्वरूपात जशास तशी जतन करून ठेवली आहे. त्या काळचे घर आहे तसे जतन करण्यात पुरातत्त्व विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या घरावर पूर्वीची कौल असून आतील भागही जसा होता तसाच अजूनही जतन केला आहे. शासनाने या पुरातन वास्तूच्या नूतनीकरणासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असे ना. सामंत यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे विभागीय शासकीय ग्रंथालय असलेल्या टिळक मेमोरीयलचे रुपडे पालटून, त्याला अद्यायावत असे स्वरूप देण्यात येणार आहे. काळाबरोबर चालणे गरजेचे असते, तसेच डिजिटलायझेशन केले जाणार आहे. यासाठीही चार कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांच्या कामासाठीही १५ कोर्टीचा निधी देण्यात आला असून, पाऊस संपल्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे. यावेळी जि.प. उपाध्यक्ष उदय बने व मान्यवर उपस्थित होते.