मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयांसाठी १०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये कोकण विभागात चिपळूणचे प्रशासकीय अधिकारी सरस ठरले आहे. कोकण विभागात उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. चिपळूण पालिकेने द्वितीय आणि उपकोषागार अधिकारी कार्यालयाने तृतीय क्रमांक मिळवून प्रशासकीय कामकाजाचा ठसा उमटवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर चिपळुणातील शासकीय कार्यालयांनी नियोजनपूर्वक कामाला सुरुवात केली. त्यानुसार प्रांत कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी, पालिका आणि उपकोषागार कार्यालयाने कार्यालयीन सेवा सुविधा, स्वच्छता, तक्रार निवारम, सुलभजीवनमान, गुंतवणुकीला चालना, तंत्रज्ञानाचा वापर, लोकसहभागातून कामे आदी बाबींवर विशेष काम केले.
येथील उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी चिपळूण व गुहागर तालुक्यात नावीन्यपूर्ण कामांवर विशेष भर दिला. ई ऑफिसमधून कमीत कमी वेळेत कामांचा निपटारा केला. विक्रमी वेळेत भूसंपादनाची कामे मार्गी लावली. फुरूस चव्हाणवाडीतील धरणग्रस्तांना एका क्लिवर त्यांचा मोबदला खातेदारांच्या बँक खात्यात जमा केला. लोकसहभागातून प्लास्टिक संकलन शेड मोहीम राबवली.