कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर शहरातील वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाणारे ६७सेएमसी अवजल मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव आहे, त्यादृष्टीने आता पाटबंधारे विभागाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. पाणी वापराकरिता पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार करण्याकरिता मळबस्ते येथे नुकताच वाशिष्ठी नदी किनारी दिल्ली येथील संस्थेकडून मृदा परीक्षणाबरोबर भूगर्भ चाचणी घेण्यात आली. गेल्या अनेक वर्षानंतर कोयना अवजलाचा पुनर्वापर करण्यावर सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. कोयना धरणातील जलविद्युत निर्मितीनंतर कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीमार्गे समुद्राला वाया जाणारे पाणी हे भविष्यात सिंचन, बिगर सिंचन वापराकरिता वळवणे प्रस्तावित आहे. वाशिष्ठी नदीतून हे पाणी सुमारे १६० कि.मी. अंतरावर असलेल्या मुंबईला जलवाहिन्यांद्वारे नेण्यावर नियोजन करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी ३८ कोटी खर्चाचे काम हवाई सर्वेक्षण व्हॅसकॉम कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.
तर आता विविध परीक्षणासाठी, कोयना अवजलाच्या भविष्यामधील पाणी वापरासाठी प्रकल्प व्यवहार्यता अहवाल तयार करण्याकरता केंद्र शासन अंगीकृत नवी दिल्ली येथील चाप्कोस लिमिटेड व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यामध्ये करार करण्यात आलेला आहे. त्यानुसार सदर कंपनीकडून गेल्या महिनाभरापासून नदी किनारी कळंबस्ते येथील स्मशानभूमी ठिकाणी विविध सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. यासंदर्भात कोलाड पाटबंधारे विभाग कार्यालयाने कळंबस्ते ग्रामपांयतीला पत्र पाठवत याबाबती माहिती दिल्याचे सरपंच विकास गमरे यांनी सांगितले. ग्रामपंचायतीमधील स्मशानभूमी जवळील जागेत मृदा संरक्षण करण्याबरोबरच हवाई सर्वेक्षण, भूगर्भ चाचणी, मृदा नमुना घेऊन मृदा परीक्षण करणे परीक्षणाची कामे अहवाल तयार करण्यासाठी करण्यात येणार असल्याने वाप्कोस कंपनी व त्यांच्या संबंधित अभियंत्यांना सहकार्य करण्याची विनंती या पत्राद्वारे पाटबंधारे विभागाने केली आहे. दिल्लीतील कंपनीच्या येथे आलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नदीवर बंधारा प्रस्तावित आहे.
येथील मोठी जॅकवेल बांधून तेथून पाणी उचलले जाणार असल्याचे प्राथमिक नियोजन आहे. त्यादृष्टीने या परिसरात विविध चाचण्या घेतल्या गेल्या. शक्यतो कोकण रेल्वे मार्गाने ट्रॅकच्या बाजूने जलवाहिनी नेण्याचा विचार असल्याचेही सांगण्यात येत आहे. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी कळंबत्ते येथे सुरू असलेल्या मृदा परीक्षणाबरोबर भूगर्भचाचणीवर आक्षेप घेत कोकण रेल्वेचे प्रलंबित वं. स्थानिकांचे प्रश्न सुटल्याशिवाय येथे बांधण्यात येणारी मोठी जॅकवेल व बंधाऱ्याचे काम आम्ही होऊ देणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे काम अर्धवट सोडून कंपनीचे कर्मचारी निघून गेले आहेत.