महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, यांच्या उपस्थितीत काल गणपतीपुळे बोट क्लबच्या उद्घाटनाची घोषणा करण्यात आली. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या कल्पनेतून व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि खा. विनायक राउत यांच्या पाठ पुराव्याने पर्यटनक्षेत्र गणपतीपुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यामतून बोट क्लब गणपतीपुळे स्थापन करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळचे सल्लागार डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या बोट क्लबची निर्मिती करण्यात आली आहे.
कोकणामध्ये पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात वाव असल्याने, अनेक अद्ययावत सोयींची उपलब्धता जर केली तर अनेक पर्यटक त्याचा लाभ घेतील. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती होऊन, अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळण्याची संधी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते व्हर्चुअल पद्धतीने गणपतीपुळे येथील बोट क्लबचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. काही प्रत्यक्ष तर काही ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक, पौराणिक, ऐतिहासिक, भौगोलिक अशी ठिकाणे लाभली आहेत. ज्यामध्ये पुरातन वास्तू, किल्ले, मंदिरे, समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे यांचा समावेश आहे. कोकणातील हि पर्यटन संस्कृती जगभरामध्ये प्रसिद्ध व्हावी यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. त्यामुळे मेक माय ट्रीप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत करण्यात आलेल्या करारामुळे रत्नागिरीच्या पर्यटन व्यवस्थेला नक्कीच सुगीचे दिवस येतील. आणि अर्थव्यवस्थेला नक्कीच मोठा हातभार लागेल अशी आशा नाम. उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.