कोरोनाच्या सावटामुळे मागील संपूर्ण वर्ष ते आता पर्यंत रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनक्षेत्र असलेल गणपतीपुळे येथील गणपतीचे मंदिर बंदच आहे. राज्यामध्ये कोरोना काळ सुरु झाल्यापासून, सुरक्षेच्या कारणामुळे सर्वच मुख्य मंदिरे व सर्व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. गणपतीपुळे येथे बारमाही येणारे भाविक मंदिर बंद असल्याने, गणपती मंदिराच्या पश्चिमेकडील मुख्य गेटसमोर उभे राहून केवळ कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतत आहेत.
भाविकांच्या मनातील हि गोष्ट लक्षात घेऊन गणपतीपुळे देवस्थान समितीने गणपती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठा टीव्ही स्क्रीन लावून त्यामध्ये थेट गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन घडवून भाविकांना दर्शन घेण्याची सोय उपलब्ध केली आहे. अनेक दिवसांपासून विविध ठिकाणहून भाविक अतिशय श्रद्धापूर्वक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.
देवस्थान समितीकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार, रोज साधारण हजार ते पंधराशेच्या दरम्यान भक्तगण गणपतीच्या दर्शनासाठी येत असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या स्क्रीनवरील दर्शनाला सुद्धा भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून भाविकांकडून एक प्रकारे दर्शन मिळते आहे, यामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या तरी याच दर्शनाने येणारे भाविक आपल्या मनातील मनोकामना व्यक्त करताना दिसून येतात. परंतु, गणपतीपुळे देवस्थानामार्फत सुरू केल्या गेलेल्या या नाविन्य उपक्रमाला सर्वच ठिकाणच्या भाविकांनी पसंती दर्शवली आहे.
मात्र, प्रत्यक्षात गणपती मंदिर लवकरच सुरू व्हावे, अशी येणाऱ्या सर्वच भाविकांची मोठी इच्छा असल्याचे देवस्थान समितीकडून सांगितले जाते. परंतु राज्य शासनाकडून अद्याप कडक निर्बंध लागू असल्याने कुठल्याही प्रकारे मंदिर सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार नसल्याचे देवस्थान समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.