26.4 C
Ratnagiri
Monday, October 13, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeDapoliगुहागर, लाडघर किनाऱ्याला ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा

गुहागर, लाडघर किनाऱ्याला ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा

या वर्षाअखेर मुख्यमंत्री किनाऱ्यांना भेट देणार आहेत.

आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग पायलट दर्जासाठी महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांची घोषणा पर्यावरण विभाग व पर्यटन संचालनालय यांनी केली असून, त्यात गुहागर आणि लाडघर या दोन किनाऱ्यांचा सामावेश आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होत असलेल्या गुहागरमधील पर्यटनवाढीला मोठा हातभार लागणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील एकही किनारा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निवडला गेलेला नव्हता. या वर्षाअखेर मुख्यमंत्री किनाऱ्यांना भेट देणार आहेत. ब्लू फ्लॅग राष्ट्रीय ज्युरी सदस्य व राष्ट्रीय ऑपरेटर यांनी महाराष्ट्रातील १० समुद्रकिनाऱ्यांची पाहणी केली होती. त्यानंतर झालेल्या मूल्यांकनातून २०२५-२६ या हंगामासाठी ५ किनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग पायलट दर्जा’ प्रदान केला आहे. त्यामध्ये डहाणूमधील पारनाका बीच, रायगड जिल्ह्यांतील श्रीवर्धन व नागाव बीच तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर बीच यांचा समावेश आहे. पर्यटनवाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीयनि घेतला आहे. गुहागरच्या पर्यटनवाढीसाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, त्याला पहिल्या टप्प्यामध्ये यश आले आहे. ब्लू फ्लॅग मानांकनासाठी गुहागर नगरपंचायतीकडून प्रस्ताव गेल्यानंतर गुहागर किनाऱ्यावर १२ ते १४ ऑगस्टमध्ये राष्ट्रीय ऑपरेटर व ब्लू फ्लॅग कमिटीने भेट दिली होती. त्या भेटीनंतर केलेल्या मूल्यांकनानुसार ही निवड करण्यात आली आहे.

ब्लू फ्लॅग पायलट दर्जा हा वर्षभरात ब्लू फ्लॅग मानांकनासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा उभ्या करण्यासाठी देण्यात आल्या आहेत. ६ किलोमीटर विस्तीर्ण असलेल्या गुहागर समुद्रकिनाऱ्यापैकी गुहागर पोलिस परेड मैदानच्या मागील बाजूचा एक किलोमीटरचा समुद्रकिनारा आरक्षित केला आहे. वर्षभरात तिथे सोयीसुविधा उभारणार असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी सांगितले. गुहागर नगरपंचायतीने ब्लू फ्लॅग पायलट दर्जासाठी आवश्यक सुविधा किनाऱ्यावर सुरू केल्या असून, लवकरच अग्निशमन वाहनही उपलब्ध होणार आहे. किनाऱ्याला मिळालेल्या दर्जामुळे गुहागर आणि लाडघर दोन्ही ठिकाणांवरील पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे. दरम्यान, ब्लू फ्लॅग पायलट दर्जामध्ये वर्षभरात ५ समुद्रकिनाऱ्यांवर सोयी-सुविधा उभारायच्या असून, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व बंदर विभागाकडून गुहागर नगरपंचायतीला जमीन हस्तांतरण करावी लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री पर्यावरण विभाग, पर्यटन विभाग यांचा समन्वय कसा राहतो, यावर पुढील यश अवलंबून राहणार आहे.

या सुविधा आहेत आवश्यक – ब्लू फ्लॅग पायलट दर्जासाठी समुद्रकिनारी शौचालय, कपडे बदलण्यासाठी खोली, शॉवरपॅनल, जलशुद्धीकरण प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, शुद्ध पिण्याचे पाणी व्यवस्था, समुद्रकिनाऱ्यावर जाणारा सुसज्ज रस्ता, पथदीप, बसण्यासाठी बाके, समुद्रकिनाऱ्यावर छत्री व आराम खुर्चा, ओपन जिम, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक, पार्किंग व्यवस्था, किनाऱ्यावर छोटे-छोटे कोकणी उत्पादन विक्रीचे स्टॉल, अग्निशमन वाहन आदी सुविधा उभाराव्या लागणार आहेत. त्यामुळे या सुविधा उभारणीचे गुहागर नगरपंचायतीपुढे आव्हान आहे.

RELATED ARTICLES

Most Popular