गुहागर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तोतया लाचलुचपत अधिकारी बनून फिरणार्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. गुहागर तालुक्यातील खाडीपट्टी भागामध्ये हे ठग आलिशान कार घेऊन त्यावर अध्यक्ष लाचलुचपत विभाग अशी पाटीही लावलेली होती. गेले २ दिवस ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची गाडी फिरत असून, पैसे उकळत असल्याची खबर गुहागर पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्यांच्या मागावरच होते.
वेळणेश्वर येथील व्यावसायिक वळंजू यांच्या दुकानासमोर एक गाडी थांबली आणि दुकानात येऊन त्यातील एका माणसाने बियरची मागणी केली. त्यांनी बियरची बाटली दिली असता, आम्ही रत्नागिरी लाचलुचपत विभागातील अधिकारी असून शासनाने आखलेल्या नियमांचे तुम्ही पालन करत नसून, तुमच्या दुकानाबद्दल माहिती आमच्या बरेच दिवस कानावर येत होती, म्हणून धाड टाकण्यासाठी आज आम्ही आलो आहोत. उद्या कोर्टामध्ये हजार राहावे लागेल असे त्यांनी सांगितले.
व्यावसायिक वळंजू यांची हे ऐकून भंबेरी उडाली. त्यांनी कोर्ट कचेरी प्रकरण मागे लागू नये म्हणून त्यांना गयावया करून प्रकरण उघडकीस न आणता, इथेच मिटवण्याची विनंती केली, त्यानंतर कार मधील दुसरा इसम बाहेर आला व त्याने प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. वळंजू यांनी त्यांची नावे विचारली असता, त्यांनी ती सांगितली नाहीत. अखेर प्रकरण मिटविण्यासाठी ७ हजारावर तडजोड करण्यात आली. वळंजूनी ५ हजार त्वरित आणि उर्वरित रक्कम नंतर देतो असे सांगितले. ते ५ हजार रुपये घेऊन कारमध्ये बसून निघून गेले, परंतु वळंजू यांना संशय आल्याने त्याने गुहागर पोलिसांकडे तक्रार केली असता, दुसर्या दिवशी सकाळी संजय वाझे,अमित महाडिक, रा. कापसाळ, आणि निलेश तावडे रा. पेढे घर्वेवाडी या तिघांना कारसकट ताब्यात घेतले. या टोळीने अशा प्रकारची अनेक कृत्य केल्याचे निदर्शनास आले आहे. पुढील तपास सुरु आहे. गुहागरचे पोलिस निरीक्षक अरविद बोडके यांनी अशा ठगांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.