रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महामार्गापासून ते अंतर्गत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात परंतु, कासव गतीने सुरु असल्याच्या वार्ता अनेक महिने कानावर येत आहे. आणि ठेकेदाराच्या नावाने शंख केला जात आहे. त्याचप्रमाणे एवढ्या धीम्या गतीने सुरु असलेल्या कामाला नक्की कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याबाबत सुद्धा चर्चा रंगत आहेत. परंतु, तळवली गावच्या एका रस्त्याच्या ठेकेदाराने मात्र या सर्व गमजा संपुष्टात आणल्या असून, एका रात्रीत डांबरी रस्ता तयार करून ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे.
तळवली गावात एका रात्रीत रस्त्याचे काम करून ठेकेदाराने इतिहासच रचला आहे, म्हणणे वावगे ठरणार नाही. परंतु, जनता यावर खुश न होता नक्की राजकीय नेत्यांनी आणि ठेकेदाराने नेमका कशासाठी हा आटापिटा केला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे. भर दिवसा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करणे आवश्यक असताना तळवली येथे मात्र ठेकेदाराने चक्क रात्रीत हे काम पूर्ण केले आहे.
पण केलेलं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून रस्त्याची खडी सर्व उखडून वर आली आहे. निकृष्ट दर्जा आणि एका रात्रीत काम होत असताना येथील राजकीय नेत्यांनी देखील ठेकेदाराला पाठबळ दिले आहे की कोणाच्या दबावाखाली ठेकेदार काम करत आहे, अशी चर्चा कामानंतर रंगू लागली आहे.
तळवली गाव हे राजकिय दृष्ट्या कायमच चर्चेत असते. त्यामुळे येथील विकासकामी देखील चर्चेत असतात. अनेक वेळा ग्रामस्थांना दर्जेदार रस्त्यांच्या किंवा इतर कामांच्या ऐवजी निकृष्ट रस्ते बनवून देऊन कायम त्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. तर अनेक वेळा स्वतःचे राजकीय वजन वापरून काम रेटून नेल्याचेही पहावयास मिळाले आहे. असाच प्रकार सध्या येथील एका रस्त्याच्या कामात झाल्याची चर्चा आता येथील सुज्ञ नागरिकांमधून बोलली जात आहे. मुख्य म्हणजे कोणाच्या भीतीपोटी अवघ्या रात्रीमध्ये ठेकेदाराने रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले.