गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली. आणि गुजरातची सत्ता पुढे कोणाच्या हाती दिली जाणार याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली.
मुख्यमंत्रीपदासाठी नितीन पटेल, मनसुख मांडवीया आणि पुरुषोत्तम रुपाला या तीन नेत्यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक होती. पण भाजपने पुन्हा एकदा आश्चर्यचा धक्का देत मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करून, गुजरातची कमान त्यांच्या हाती दिली.
भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आहे. आज दुपारी २.२० मिनिटांनी भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री पदाची शपथविधी सोहळा पार पडणार असून त्यानंतर दोन दिवसांनी कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मुख्यमंत्री पदावरून भाजपची एक अत्यंत महत्त्वाची बैठक रविवारी पार पडली. याच बैठकीमध्ये गुजरातचे नूतन मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक मोठमोठ्या नेत्यांची नावे चर्चेत होती. पण भाजपने एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आणि पाटीदार समाजातून येणाऱ्या भूपेंद्र पटेल यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली.
भूपेंद्र पटेल हे बऱ्याच काळापासून संघाशी संलग्न आहेत. त्याचप्रमाणे पटेल समाजातही त्यांची चांगली पकड दिसून आली आहे. २०१७ सालच्या निवडणुकीत त्यांनी विरोधकांवर मत करून चांगल्या मतांनी विजय मिळवला होता. विधानसभा निवडणूकीमध्ये भूपेंद्र पटेल हे १ लाख १७ हजार मतांनी विजयी झाले होते. या शपथविधी सोहळ्यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि गृहमंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.