रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला भाटकरवाडा परिसरात शुक्रवारी भल्या पहाटेच्या अंधारात ३ दुचाकी जाळण्यात आली. त्यासोबतच घटनास्थळी तेढ निर्माण होईल, असे पोस्टरही आढळल्याने पोलिसांनी. सतर्कता बाळगत वेगाने तपास सुरू केला असून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. काही विघ्नसंतोषी मंडळींचे हे काम असावे अशी जोरदार चर्चा शहरात सुरु आहे. दरम्यान ही आग रात्री १२.३० ते पहाटे ४.३० च्या सुमारास लावण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांनी शांतता पाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून पत्रकारांना मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पेठकिल्ला, भाटकरवाडा परिसरात शुक्रवारी (२७ जून) पहाटे झालेल्या या जाळपोळीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात व्यक्तीकडून ३ दुचाकी जाळून टाकण्यात आल्या असून, त्या ठिकाणी ‘जय श्रीराम’ आणि ‘गेम्स फॉर ऑल’ असे लिहिलेले पोस्टर्स सापडल्याने कुणा समाजकंटकांचा धार्मिक तेढ निर्माण होईल असा प्रय्तन असावा. त्यामुळे परिस्थिती संवेदनशील बनली. यामुळे काही समाजकंटकांचा अशांतता पसरवण्याचा हा प्रयत्न असावा, असा दावा परिसरातील रहिवासी आणि काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून पोलिसांनी सर्व बाजूंनी निःपक्षपातीपणे तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे.
३ दुचाकी जाळल्या – पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, आगीत भस्मसात झालेल्या दुचाकी या फजल इस्माईल मिरकर (रा. भाटकरवाडा), अजिज बशीर पाटणकर, निहाल मकसूद मुल्ला यांच्या असून या तीनही गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्या आहेत. आग लागताच भल्या पहाटेसुध्दा मदतीला धावून आलेल्या अनेक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही मिनिटांतच गाड्या भस्मसात झाल्या.
पोलीस घटनास्थळी – घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले असून, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत, ही घटना गंभीर असून पोलीस यंत्रणा सर्व अंगाने तपास करत आहे. दोषींचा लवकरच शोध लावून अटक करू असे जिल्हा पोलिस अधिकक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकारांना सांगितले. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी शांतता पाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी – दरम्यान, या दुचाकींना आग का लावली याचे मूळ कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही एखाद्या वैयक्तिक वादातून घडलेली घटना आहे की हेतुपुरस्सर जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले असून, लवकरच आरोपीचा माग काढण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाटकरवाडा, पेठकिल्ला परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून एसआरपीएफ पथकही तैनात करण्याची शक्यता आहे.
धागेदोरे सापडले? – शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पोलिसांच्या हाती काही धागेदोरे मिळाल्याची माहितीदेखील पुढे आली आहे. आरोपींना लवकरच पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.