26.9 C
Ratnagiri
Sunday, January 5, 2025

राज्यातील आता चोरटी वाळूला बसणार चाप…

राज्यातील वाळूमाफियांना वेसण घालण्यासाठी फडणवीस सरकारने मोठं...
HomeRatnagiriलांजा महामार्गावरील अतिक्रमणावर हातोडा - पोलिस बंदोबस्तात कारवाई

लांजा महामार्गावरील अतिक्रमणावर हातोडा – पोलिस बंदोबस्तात कारवाई

जागेतील इमारती, टपऱ्या, दुकाने यांच्यावर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती.

लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या महामार्ग भूसंपादित जागेतील इमारती, दुकाने, टपऱ्या हटवण्याची कारवाई आज सकाळपासून हाती घेण्यात आली होती. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तसेच राज्य राखीव पोलिसदलाची तुकडी तैनात करण्यात आली होती. शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेवर टपरीधारक, दुकानदार यांनी बस्तान बसवले होते तर अनेक वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाच्या पिलरच्या कामाने वेग घेतल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे; मात्र शहरात भूसंपादित जागेतच अनेक ठिकाणी टपऱ्या दुकाने उभारण्यात आलेली होती तर काही ठिकाणी चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जागेतील अनेक इमारत मालकांना, दुकानदारांना त्यांच्या जागेचा मोबदला दिला गेला नसल्याने अशांकडून आपल्या इमारती, दुकाने हलवण्याबाबत अडथळा केला जात होता. शहरातील एकूण ४७ प्रकरणात इमारत मालकांनी आपल्या बांधकामांवर हातोडा फिरवण्यास नकार दिला होता. त्यामुळे शहरात चौपदरीकरणाचे कामे पूर्णपणे रखडले होते.

या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी राजापूर यांनी तहसीलदारांना पत्र देऊन राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडथळा निर्माण होणारी संपादित जागा व इमारती, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधून पुढील चार दिवसात पोलिस संरक्षण घेऊन राष्ट्रीय महामार्ग हस्तांतरण करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे महसूल नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे, निवडणूक नायब तहसीलदार विलास सरफरे या दोघांची कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. संबंधित जागा, इमारती मालक, दुकानदार यांना देखील याबाबतची माहिती देण्यात आली होती. यानुसार गुरूवारी सकाळी ११ वाजल्यापासून लांजा शहरातील भूसंपादित जागेतील इमारती, टपऱ्या, दुकाने यांच्यावर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. या कारवाईवेळी लांजा तहसीलदार प्रियंका ढोले, लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता, संबंधित ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

कारवाईचा धसका – अतिक्रमणावर प्रशासनाकडून हातोडा मारण्यास सुरवात झाल्यानंतर शहरातील व्यापारी, टपरीचालक यांनी आपापली दुकाने, दुकाने सामान व अन्य माल व साहित्य स्वतःहून हलविले.

RELATED ARTICLES

Most Popular