मुंबईच्या केईएम रुग्णालयातून एका छोट्या मुलाचे अपहरण करून त्याला कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्सप्रेसमधून पळवून नेताना कोकण रेल्वेचे तिकीट तपासणीस संदेश चव्हाण यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुंबईच्या दादर रेल्वेस्थानकावरच या मुलाची सुटका करत आरोपीला अटक केली. टीसी संदेश चव्हाण यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे हा मुलगा सुखरूपपणे आई-वडिलांकडे आला असून कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी संदेश चव्हाण यांचे कौतुक करत १५ हजार रूपयांचे विशेष पारितोषिक त्यांना जाहीर केले. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दादर ते सावंतवाडी (तुतारी एक्सप्रेस) या रेल्वेगाडीत कोण रेल्वेचे टीसी संदेश चव्हाण यांना एक व्यक्ती एका लहान मुलाबरोबर आढळून आली. त्या व्यक्तीच्या हालचाली चव्हाण यांना संशयास्पद वाटल्या. त्या व्यक्तीचे मुलाबरोबरचे वागणे टीसी चव्हाण आणि अन्य काही प्रवाशांना देखील खटकत होते. संदेश चव्हाण यांना संशय आल्याने त्यांनी त्या संशयित व्यक्तीची चौकशी सुरू केली. पण त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. यामुळे चव्हाण यांना ते मूल त्याचे नसून त्याने पळवून आणले आहे, असा संशय वाटला. चौकशीमध्ये तो अधिक बळावला.
आरोपी मूळ देवगडचा – स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संदीप चव्हाण यांनी त्या व्यक्तीला धरून ठेवले. आणि तात्काळ चालत्या ट्रेनमधूनच नियंत्रण कक्ष वाडी बंदर लोहमार्ग मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे यांना माहिती दिलीः यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक धुमाळे, वरिष्ट पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने, सहाय्यक पोलिस निरीक्षक ताजने, आणि ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलिसांनी सदर संशयित व्यक्तीला व त्याच्या कडील मुलाला, ताब्यात घेतले. संशयित आरोपीचे नाव अमोल अनंत उदलकर (वय ४२, राहणार इंदील, देवगड) असे असल्याची माहिती रेल्वे पोलीसांनी पत्रकारांना दिली.
रूग्णालयातून पळवले – हे मुल त्याने मुंबईतील केईम रुग्णालयातून पळवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले. या बाळाची आई रुग्णालयात उपचार घेत होती. त्यावेळी आजीकडे असलेल्या या मुलाचे अपहरण केले होते. आरोपीला भुईवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोकण रेल्वेचे टीसी संदेश चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे या अपहरण झालेल्या मुलाला वाचवण्यात यश आल्याने टीसी संदेश चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोकण रेल्वेमध्ये सेवा बजावताना दाखवलेल्या या सतर्कतेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी तात्काळ घेत संदेशचे विशेष कौतुक करत त्यांना १५ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे. संदेश चव्हाण यांना कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले आहे.