कोकणातील हापूसला सातासमुद्रापार प्रचंड मागणी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरीतून थेट हापूसची निर्यात केली जात आहे. यंदा कोकणातील हापूसची चव प्रथमच लेबनानवासीयांनी चाखली आहे. रत्नागिरीतील आंबा बागायतदार सलील दामले यांनी एक टन आंबा लेबनानला निर्यात केला आहे. आतापर्यंत कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, चायनासह जपानला सहा टन आंबा थेट निर्यात केला आहे. दर्जेदार हापूसचे उत्पादन घेण्यासाठी सलील दामले यांचे नाव घेतले जाते. यंदा हापूसचे उत्पादन चांगले आले आहे.
त्यामुळे वाशीसारख्या बाजारात दलालांकडील दर कमी झाले आहेत; परंतु अनेक आंबा बागायतदार थेट ग्राहकाकडे विक्री करण्यावर भर देत आहेत. स्थानिक मार्केटबरोबरच निर्यातीवरही काही बागायतदारांचा कल असतो. त्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील आंबा बागायतदार सलील दामले यांचे नाव घेतले जाते. निर्यातीसाठी आवश्यक परवानग्या घेत ते गेली काही वर्षे विविध देशांमध्ये आंबा पाठवत आहेत. यंदा एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातच निर्यातीला सुरुवात केली आहे.
आतापर्यंत लेबनान या देशात रत्नागिरीतील बागायतदारांकडून थेट हापूस पाठवण्यात आलेला नव्हता. दामले यांच्यामार्फत एक टन आंबा नुकताच निर्यात केला गेला आहे. तिथे उष्णजल प्रक्रिया करून आंबे पाठवले जातात. चेन्नई येथील प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून हापूस विमानाने लेबनानला गेला. जिल्ह्यातून प्रथमच आंबा गेल्याचे दामले यांनी सांगितले. आतापर्यंत चायना, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा या देशात सुमारे सहा टन आंबा पाठवण्यात आला असून, लवकरच जपानला एक टन आंबा रवाना होणार आहे.
निर्यातीसाठी गॅप सर्टिफिकेट अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर कृषी विभागाचा अॅनलायटिक रिपोर्ट महत्त्वाचा असतो. हा अहवाल निर्यातीसाठी गरजेचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बागायतदारांनी कृषी विभागाकडून याचा परवाना घेतला आहे. त्यासाठी बागांमध्ये वापरण्यात येणारी औषधे, खते यांची सविस्तर माहिती द्यावी लागते. बागांचे व्यवस्थापन कसे केले जाते, याची नोंदही ठेवली जाते. त्यानंतरच कृषी विभागाकडून अहवाल देण्यात येतो.