जिल्हा पोलिस दलातर्फे मिशन फिनिक्स अंतर्गत अमली पदार्थविरोधात आज पुन्हा धडक कारवाई केली. केळशी (ता. दापोली) मोहल्ला येथून एकाकडून चरसच्या आणखी ४ पिशव्या जप्त केल्या. त्याचे वजन ४.७३१ किलो असून, त्याची किंमत १८ लाख ९२ हजार आहे. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत ५.७२९ किलो म्हणजे २२ लाख ९२ हजार ४०० किमतीचा चरससदृश अमली पदार्थ ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी आतापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकिल अब्बास होडेकर (वय ४९, रा. उंबरशेत केळशी, ता. दापोली) याला ताब्यात घेतले आहे. आणखी एकाचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला आहे. ताबीस महमूद डायली (वय ३०, रा. केळशी किनारा मोहल्ला) याला देखील ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत ३ संशयितांना ताब्यात घेतले आहे. दापोलीचे प्रभारी अधिकारी महेश तोरसकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केळशी किनारा मोहल्ला येथे पथकाने छापा टाकला. तिथे राहणाऱ्या अब्रार इस्माईल डायली (३२) यांच्या घराच्या पडवीत ०.९९८ किलो वजनाचा सुमारे ४ लाखांचा चरस सापडला होता. वेष्टनावर इंग्रजीत सिक्स गोल्ड (६-Gold) आणि कोरियन भाषेत मजकूर लिहिलेला आढळला.
त्यातील सर्व मुद्देमाल जप्त केला असून संशयित अन्नार डायलीविरुद्ध अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करताना अब्रार केळशी मोहल्ला येथील अकिल होडेकर याने चरससदृश अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने दिला होता हे निष्पन्न झाले. त्यावरून होडेकर यास ताब्यात घेतले. त्याने आणखी ४ पिशव्या असल्याबाबत तसेच त्या त्याने मंडणगड तालुक्यातील साखरी गावाचे समुद्रकिनारी झुडपात लपवून ठेवल्याचे कबूल केले. पोलिसांनी साखरी समुद्र किनारी जाऊन ४ पिशव्या पंचनामा करून ताब्यात घेतल्या. साखरी गावाचे समुद्र किनारी एकूण १८ लाख ९२ हजार ४०० किमतीचा ४.७३१ किलो चरस मिळून आला. या दाखल गुन्ह्यात एकूण ५.७२९ किलो वजनाचा २२ लाख ९२ हजार ४०० किमतीचा चरस ताब्यात घेण्यात आला आहे.