प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील हातखंबा तिठा येथे ९ जिवंत गावठी हातबॉम्बची वाहतूक करणार्या दोघा स्वारांना अटक करण्यात आली होती. त्याबाबत अधिकचा तपास पोलिसांकडून सुरु असताना अजून दोन जणांची नावे समोर आली आहेत. या प्रकरणी संशयितांच्या अन्य दोन साथिदारांच्या मुसक्या ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आहेत.
सोमवारी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे पथक वेंगुर्ल्यात तपासासाठी गेले असता, दर्शन गणेश चव्हाण, पांडुरंग यशवंत परब दोन्ही रा. परबवाडी, वजराठ ता. वेंगुर्ला, सिंधुदुर्ग अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी शनिवारी हातखंबा तिठा येथे अटक केलेल्या रामा सुरेश पालयेकर रा.वडखोल, ता. वेंगुर्ला, सिंधुदुर्ग आणि श्रीकृष्ण केशव हळदणकर रा. गावडेश्वर मंदिराजवळ वेंगुर्ला, सिंधुदुर्ग यांना अटक केली होती. एकूण चौघांना १८ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला शनिवारी सायंकाळी दोन तरूण गावठी हातबॉम्ब घेऊन दुचाकीवरून रत्नागिरीत येत असल्याची गोपनीय खबर मिळाली होती. त्यानुसार, पथकाने त्यांना मुद्देमालासह पकडण्यासाठी हातखंबा तिठा येथे सापळा रचला होता. शनिवारी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर दोघांना हातखंबा येथून अटक करून त्यांच्याकडून ४ हजार ५०० रुपयांचे ९ गावठी हात बॉम्ब, एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दहशतवाद विरोधी पथकाने या दोघांनाही संशयितरीत्या वर्तनामुळे ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांकडे सुपूर्द केले. तेंव्हा न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली होती.