राजापूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले येथील टोलनाक्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याची चर्चा सुरू आहे. बुधवारी पनवेलमध्ये महामार्गाच्या दूरावस्थेविरोधात झालेल्या निर्धार मेळाव्यात राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचा आदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर गुरूवारी हातिवले येथील टोलनाक्याची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याचे वृत्त आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची झालेली चाळण व राजापुरातील काम काही अंशी अपूर्ण असताना हातिवले येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर यापूर्वी २ ते ३ वेळा टोलवसूली सुरू करण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदार कंपनीकडून करण्यात आला होता. त्यावेळी टोलवसुलीविरोधात तालुकावासीयांनी जोरदार आंदोलनही केले होते. त्यामुळे टोलवसूली थांबविण्यात आली होती. अशातच गुरूवारी काहीजणांनी टोलनाक्यावर तोडफोड केली आहे. दंडुक्याच्या सहाय्याने टोल वसूली करणाऱ्यांच्या केबीनच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.
मनसेने केली तोडफोड ? – दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांची चौकशी केल्याची चर्चा राजापूर शहरात सुरू आहे. बुधवारी पनवेल येथे झालेल्या मनसेच्या निर्धार मेळाव्यात मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेल्या कामाविरोधात उग्र आंदोलन करा, असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना दिले होते. या पार्श्वभूमीवर गुरूवारी राजापुरातील हातिवले येथील टोलनाक्याची तोडफोड झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनीच टोलनाक्यावरील केबीनची तोडफोड केली असावी, असा संशय असून त्या अनुषंगाने पोलिसांनी मनसेच्या २ कार्यकर्त्यांची चौकशी सुरू केल्याची चर्चा राजापूर शहरासह आजुबाजूच्या परिसरात सुरू आहे. पोलिसांकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.